पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

35. आजचा शब्द 'योग'.

इमेज
   योग म्हणजे जोडणे, उपचार, उद्योग, श्रम, परिणाम. दररोजच्या वापरात प्रयोग, उपयोग, संयोग हे सतत भेटणारे शब्द आहेत.  मात्र याला अभि उपसर्ग लावला की 'अभियोग' होतो. अभियोग म्हणजे आरोप, युद्ध, हल्ला. ज्याच्यावर आरोप असतो त्याला हिंदीत 'अभियुक्त' म्हणतात. राष्ट्रपतीसारख्या मोठ्या व्यक्तीवर आरोप असतील तर त्यावर 'महाभियोग' लावला जातो. महाभियोगाचा खटला चालवूनच अशा व्यक्तीला पदावरून काढता येते. एखाद्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी 'आयोग' नेमला जातो. त्यावरील अधिकारी 'आयुक्त' असतो. नियोग म्हणजे आज्ञा, नेमून दिलेले काम. असे काम नेमून दिले की, त्याला 'नियुक्त' केले असे म्हणतात.  योगचा भूतकाळ युक्त. योग म्हणजे जोडणे. त्यामुळे गरजेनुसार जोडणी करून काम फत्ते करणारी गोष्ट म्हणजे 'युक्ती' असते. वापरण्यास अनुकूल वस्तू 'उपयुक्त' असते.  अध्यात्मात ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि अष्टांगयोग प्रसिद्ध आहे.  युज् हा धातू वरील सर्व शब्दांमध्ये समान आहे. युज् पासूनच योजना, नियोजन, संयोजन, आयोजन, प्रयोजन असे शब्द बनतात. ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष आयुष...

सवाल उतने नहीं हैं...

इमेज
  'मन सुद्ध तुझं' मालिकेचा मागील रविवारचा भाग सर्व सजिवांना जिवंत राहण्यासाठी एक विशिष्ट तापमान लागते. त्यापेक्षा फार जास्त किंवा कमी तापमान झाले की जीव होरपळतो किंवा गोठून जातो. मुलांच्या मनालाही घरातून ऊबदार वातावरण मिळाले तर त्यांचे मन खुलते, बहरते. मात्र घरातील मोठी माणसे हिंसक, व्यसनी, अतिरागीट असतील तर मुलांच्या मनावर त्याचा किती वाईट परिणाम होतो हे आपल्याला माहीतच आहे. पण हा परिणाम स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारापर्यंत जाऊ शकतो आणि हा आजार अनेक वर्षे कसा छळतो याचे वास्तव चित्रण 'मन सुद्ध तुझं' या एबीपी माझा वाहिनीवरील मालिकेच्या चौथ्या भागात येते. स्किझोफ्रेनियाला मराठीत छिन्नमनस्कता म्हणतात. कविता नावाच्या मुलीला तिची आई डाॅक्टरांकडे घेऊन येते. चार घरी स्वयंपाक करून जगण्यासाठी धडपडणारी निर्मला नावाची ही गरीब बाई असते. कविता बर्‍याचदा आपल्याच तंद्रीत असते. एकटीच काही तरी पुटपुटते. अंघोळ करत नाही. दिवसभर झोपून असते वगैरे तिच्या तक्रारी असतात. पण कविताचे म्हणणे असते की, तिच्या बापाने प्रचंड संपत्ती मागे ठेवली आहे आणि त्याची मोजदाद ती मनातल्या मनात करत असते. तिची ...

34. आजचा शब्द 'भव'.

इमेज
  भव म्हणजे उत्पन्न होणारा, उत्पत्ति, संसार, जग इत्यादी. संसाराच्या सागराला 'भवसागर', 'भवसिंधू' म्हणतात. संत नामदेवांनी तर 'भवमूळव्याध' असा या जगाचा उल्लेख केला आहे. ज्याने जगात येऊन अनेक कामे केली त्याला 'अनुभव' आहे असे म्हणतात. जिंकण्यापासून दूर झाला तर त्याचा 'पराभव' होतो. 'विभव' म्हणजे सामर्थ्य, संपत्ती. ज्याच्याकडे हे दोन्ही आहेत त्याच्याकडे 'वैभव' असते. (विजेच्या दाबाला 'विभवांतर' असे नाव आहे. त्याला इंग्रजीत पोटेन्शिअल डिफरन्स किंवा व्होल्टेज म्हणतात. भारतात हे सामान्यपणे 230 व्होल्ट असते.) सम् उपसर्गाने 'संभव', संभाव्य', 'संभावित' अशी शक्यता व्यक्त होते. समस्या 'उद्भवली' असे म्हणतात तेव्हा उद् हा उपसर्ग लागलेला असतो. बर्फाचे पाणी होते तेव्हा 'द्रवीभवन', द्रवाची वाफ होते तेव्हा 'बाष्पीभवन' आणि पाण्याचा बर्फ होतो तेव्हा 'घनीभवन' होते. गुरू नानकदेवांनी बीजमंत्रात 'निर्भव' असा शब्द उच्चारला आहे. 'निर्भव' म्हणजे जो या जगातील सर्व समस्यांतून मुक्त आहे तो...

33. आजचा शब्द 'पतन'.

इमेज
पतन पतन म्हणजे उतरणे, मावळणे, अवनति, र्‍हास. माणसाच्या वागण्याचा दर्जा घसरला की त्याचे 'अधःपतन' झाले असे म्हणतात. 'उर्ध्वपातन' हा त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द. ज्या पाण्यात क्षार व इतर अशुद्धी असेल त्याला उष्णता देऊन त्याची वाफ करतात. ती वर जाणारी वाफ थंड करून तिचे पुन्हा पाणी बनवतात. हे शुद्ध पाणी असते. ही प्रक्रिया म्हणजे 'उर्ध्वपातन'. इंग्रजीत अशा पाण्याला डिस्टिल्ड वाॅटर  म्हणतात. (हे पाणी बॅटरीत टाकले जाते. दारू गाळण्यासाठीसुद्धा उर्ध्वपातन केले जाते. म्हणून दारूच्या कारखान्याला 'डिस्टिलरी' म्हणतात.) पतन म्हणजे पडणे असाही अर्थ आहे. त्यावरून 'गर्भपात' असा शब्द आला. धबधब्यातून पाणी वेगाने खाली पडते म्हणून त्याला 'जलप्रपात' म्हणतात. खाली पडून नमस्कार केला की त्याला 'प्रणिपात' म्हणतात. हल्ला करणे, भेटणे, भिडणे म्हणजे 'संपात'. (जेव्हा बरोब्बर 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते तेव्हा 'वसंत संपात' किंवा 'शरद संपात' बिंदू असतो.) शत्रूचा नाश करणे म्हणजे 'निःपात'.  पतन म्हणजे पडणे असले तरी 'उत...

ज़बाने उर्दूही बोलतो

इमेज
  ज़बाने उर्दूही बोलतो कवतुके शहाजहानच्या दरबारातील चंद्रभान नावाच्या ब्राह्मणाने  उर्दू भाषेतील पहिली गझल लिहिली... न जाने किस शहर अंदर हमनको लाके डाला है। न दिलबर है, न साकी है, न शीशा है, न प्याला है।। अस्सल भारतीय भाषा असलेल्या उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषा इतक्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत की त्यांना वेगळे करणे कुणालाही शक्य नाही. रस्ता, रक्कम, बक्षिस, मंज़ूर, फायदा, रहदारी, कैफ़ियत, मैफ़ल, ज़र्द, मर्द, खुर्द, बुद्रुक असे हजारो उर्दू, अरबी, फारसी शब्द मराठी माणसाने आत्मसात केले आणि स्वतःची भाषा समृद्ध बनवली. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. यातील 'हयात' आणि 'दाखला' हे दोन्ही शब्द अरबी, उर्दूमार्गे मराठीत रुळले आहेत. तहसील, महसूल, तहसीलदार, तपशील हे शब्दही अरबीतून उर्दूने आणि नंतर मराठीने घेतले.  ज़मीन, ज़मीनदार हे फारसी मातीतले शब्द आहेत. ज़मींदोज़ म्हणजे भुईसपाट. मराठीने हा शब्द बदलून 'जमीनदोस्त' करून टाकला. तफ़सीलचा तपशील झाला. दफ्तर मध्ये 'दप्तर' असा बदल होऊन ते मुलांसोबत शाळेत जाऊ लागले किंवा तलाठ्याचे दप्तर झाले. पोलिसांना गुप...

ज़बाने उर्दूही बोलतो कवतुके

इमेज
ज़बाने उर्दूही बोलतो कवतुके शहाजहानच्या दरबारातील चंद्रभान नावाच्या ब्राह्मणाने  उर्दू भाषेतील पहिली गझल लिहिली... न जाने किस शहर अंदर हमनको लाके डाला है। न दिलबर है, न साकी है, न शीशा है, न प्याला है।। अस्सल भारतीय भाषा असलेल्या उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषा इतक्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत की त्यांना वेगळे करणे कुणालाही शक्य नाही. रस्ता, रक्कम, बक्षिस, मंज़ूर, फायदा, रहदारी, कैफ़ियत, मैफ़ल, ज़र्द, मर्द, खुर्द, बुद्रुक असे हजारो उर्दू, अरबी, फारसी शब्द मराठी माणसाने आत्मसात केले आणि स्वतःची भाषा समृद्ध बनवली. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. यातील 'हयात' आणि 'दाखला' हे दोन्ही शब्द अरबी, उर्दूमार्गे मराठीत रुळले आहेत. तहसील, महसूल, तहसीलदार, तपशील हे शब्दही अरबीतून उर्दूने आणि नंतर मराठीने घेतले.  ज़मीन, ज़मीनदार हे फारसी मातीतले शब्द आहेत. ज़मींदोज़ म्हणजे भुईसपाट. मराठीने हा शब्द बदलून 'जमीनदोस्त' करून टाकला. तफ़सीलचा तपशील झाला. दफ्तर मध्ये 'दप्तर' असा बदल होऊन ते मुलांसोबत शाळेत जाऊ लागले किंवा तलाठ्याचे दप्तर झाले. पोलिसांना गुप्त...

26. आजचा शब्द 'क्रम'.

इमेज
  क्रम क्रम म्हणजे चालणे, जाणे, उडी मारणे, व्यापणे, पाऊल. नियमापेक्षा जास्त जागा व्यापली की 'अति' हा उपसर्ग लागून याचे 'अतिक्रमण' होते. साथीचा रोग समाजात पसरला की 'संक्रमण' होते. हल्ला केला की 'आक्रमण' होते. हल्ल्यात शौर्य गाजवले की 'पराक्रम' होतो. पराक्रम म्हणजे उद्योग असाही अर्थ आहे. हे दोन्ही शब्द मराठीत कधी कधी उलट अर्थानेही वापरले जातात. 'पराक्रम किंवा उद्योग करून ठेवले' या वाक्यात ती नकारात्मक छटा दिसते.  विशेष उंची गाठली की 'विक्रम' होतो. विक्रम करणारा सूर्यासारखा तेजस्वी असेल तर त्याला 'विक्रमादित्य' म्हणतात. (चक्रासारखी ज्याची बुद्धी भिरभिरते त्याला मराठीत 'चक्रम' म्हणतात. त्याचा 'क्रम' या शब्दाशी काही संबंध नाही.) एखाद्या गोष्टीभोवती एकेक पाऊल टाकत फिरले की 'परिक्रमा' होते. उत् म्हणजे वर. उत्क्रमण म्हणजे वर जाणे. प्राण वर गेले की त्याला 'प्राणोत्क्रमण' म्हणतात. एकानंतर एक रचना केली की तिला 'अनुक्रम' म्हणतात. पुस्तकात पहिल्या पानावर 'अनुक्रमणिका' दिलेली असते. अभ्यासक...

25. आजचा शब्द 'नय'.

इमेज
  नय नय म्हणजे जाणे, आचरण, मुत्सद्देगिरी, न्याय, नीति. याला विविध उपसर्ग लागून अभिनय, राजनय, अनुनय असे अनेक शब्द तयार होतात. एखाद्या विशिष्ट मनःस्थितीकडे घेऊन जाणे म्हणजे अभिनय. राजकीय मुत्सद्देगिरी म्हणजे राजनय. राजनय करणार्‍याला राजनयिक म्हणतात. 'नय'चा एक अर्थ नीति. त्यापासून 'राजनीति' हा शब्द तयार झाला. अनुनय म्हणजे विनंती, मन वळवणे. परि हा उपसर्ग लागला की 'नय'चे परिणय होते. परिणय म्हणजे विवाह. 'नयन' म्हणजे नेणे किंवा दाखवणे. त्यामुळेच डोळ्याला नयन म्हणतात. हिंदीत त्याचे 'नैन' झाले. गुरुजवळ शिष्याला नेण्याचा संस्कार म्हणजे उपनयन. विनय, प्रणय, निर्णय असे अनेक शब्द आपल्याला माहीत आहेत. नय म्हणजे जाणे किंवा घेऊन जाणे. त्यावरून लोकांना विशिष्ट दिशेला नेतो तो नायक किंवा लोकनायक. तो जर अधिकृत असेल तर 'अधिनायक'. (राष्ट्रगीतामधील हा चौथा शब्द आहे.) नायक जर विशेष असेल तर 'विनायक'. मोठा असेल तर महानायक. दुष्ट असेल तर खलनायक. रघुकुळातील असेल तर रघुनायक. यदुकुळातील असेल तर यदुनायक. गौतम बुद्धांचे एक नाव 'नायक' असे आहे. नाईक, नाईकवा...

24. आजचा शब्द 'भा'.

इमेज
भा भा म्हणजे तेज, प्रकाश, कांती, सौंदर्य. शोभा, प्रभा, आभा अशा अनेक नावांमध्ये हा धातू आहे. अमिताभ बच्चन यांच्या नावातही हाच धातू आहे. 'आभा किंवा आभ' म्हणजे तेजाचे वलय. त्यानुसार सुवर्ण + आभ म्हणजे सुवर्णाभ. त्याचा अर्थ सोन्यासारखे तेजस्वी वलय. अमित + आभ म्हणजे अमिताभ. अमर्याद तेजाचे वलय म्हणजे अमिताभ. हे गौतम बुद्धांचे एक नाव आहे. प्रभा म्हणजे प्रकाश आणि प्रभात म्हणजे पहाट.  एखाद्या व्यक्तीमध्ये बुद्धी किंवा कल्पनाशक्तीची चमक असेल तर तिला 'प्रतिभा' म्हणतात. प्रकाशित करणारा या अर्थामुळे सूर्याला भास्कर, प्रभाकर, भानु, विभाकर, विभावसु अशी नावे मिळाली. मात्र विभावरी म्हणजे रात्र. सूर्यासाठी 'भाम' असेही एक नाव आहे. त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे 'भामा'. म्हणजे रागीट स्त्री. कृष्णाच्या एका पत्नीचे नाव सत्यभामा होते. या नावावरून तिच्या स्वभावाचा अंदाज येईल. 'भामिनी' या नावाचा अर्थही सुंदर किंवा रागीट स्त्री असा आहे. भा या धातूने चमकणारे असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आप...

23. आजचा शब्द 'न्यास'.

इमेज
  न्यास न्यास म्हणजे खूण, निशानी, ठसा, छाप, ठेव (डिपाॅझिट), त्याग करणे, खाली ठेवणे, रेखाटन करणे. नृत्य करणारी व्यक्ती ज्या लालित्याने जमिनीवर पाय ठेवते त्यास 'पदन्यास' म्हणतात.  चालण्याची शैली किंवा वाक्यात शब्दांची व्यवस्थित रचना करणे म्हणजे पदविन्यास. इमारत बांधण्यापूर्वी पहिला दगड ठेवणे म्हणजे 'शिलान्यास'. कोणत्याही लिपीत शाईने कागदावर अक्षरे उमटवली की तो 'लिपिन्यास' होतो. अर्थांतरन्यास नावाचा एक अलंकार कवितेत वापरला जातो. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे ठेवणे. एक विशिष्ट अर्थ दुसर्‍या अर्थाकडे नेऊन ठेवला की तो अर्थांतरन्यास अलंकार होतो. 'कठिण समय येता कोण कामास येतो' ही कविता अर्थांतरन्यास अलंकाराचे उदाहरण आहे. (नलोपाख्यान- रघुनाथ पंडित) न्यास म्हणजे ट्रस्ट. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय त्यासाठीच असते.  ज्या व्यक्तीकडे इतरांच्या ठेवी असतात तिला न्यासधारी म्हणतात आणि ज्या व्यक्तीने सर्व ठेवी बाजूला सारल्या तिने 'संन्यास' घेतला असे म्हणतात.  न्यासचा भूतकाळ 'न्यस्त' आणि संन्यासचा भूतकाळ 'संन्यस्त'. एखादे कार्य वरून...

22. आजचा शब्द 'चर'.

इमेज
  चर चर म्हणजे हालणारा, सरकणारा, सचेतन. भूचर, जलचर, खेचर, उभयचर हे सजिवांचे प्रकार आपण शाळेत शिकतो. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशात फिरतात त्यांना खेचर म्हणतात. चराचर सृष्टी म्हणजे ज्यात चर आणि अचर अशा दोघांचाही समावेश होतो. रात्री भटकतात ते निशाचर. उंदीर, साप इत्यादी निशाचर प्राणी आहेत. गुप्तपणे फिरतो तो गुप्तचर. नेत्याच्या मागे मागे फिरतो तो अनुचर. फिरण्यासाठी उपयोगात येतात ते पाय म्हणजेच 'चरण'.  जनावरे गवत खात फिरतात म्हणून त्याला मराठीत 'चरणे' म्हणतात. चरणे म्हणजे मुळात भटकणे, विचरण करणे. एखाद्या मंदिरातील मूळ मूर्ती तशीच ठेवून त्यासारख्या दुसर्‍या मूर्तीची मिरवणूक काढतात. त्या दुसर्‍या मूर्तीला 'चरमूर्ती' किंवा उत्सवमूर्ती म्हणतात. सोने, दागिने, पैसे अशा जंगम मालमत्तेला 'चरद्रव्य' म्हणतात.  या सर्व शब्दांच्या मागे 'चर्' हा धातू आहे.  याला विविध उपसर्ग लागतात आणि विचार, आचार, समाचार, उच्चार, संचार, दूरसंचार, उपचार, प्रचार, असे अनेक शब्द तयार होतात. चर् धातूला परि हा उपसर्ग जोडला की 'परिचर' असा शब्द बनतो. परिचर म्हणजे सेवाशुश्रुषा करणे....

21. आजचा शब्द 'कल्प'.

इमेज
  कल्प कल्प म्हणजे शक्य, योग्य, समर्थ, नियम, निश्चय इत्यादी. विचारपूर्वक निश्चय केला तर त्याला 'संकल्प' म्हणतात. निर्णय घेताना मनात शंका, पर्याय असेल तर त्याला 'विकल्प' म्हणतात.  एखादे काम पुढे घेऊन जायचे असेल तर तो 'प्रकल्प' होतो. (इंग्रजीतही त्याला 'प्रो' हा उपसर्ग लावून 'प्रोजेक्ट' म्हणतात.) कल्पन म्हणजे कापणे, रचना करणे. कात्रीसाठी कल्पनी असा शब्द आहे. त्यामुळे कात्रीने विविध केशरचना करणारे न्हावी 'कल्पक' किंवा 'कल्पकार' असतात. कल्पनेतील वस्तू देणारे काल्पनिक झाड म्हणजे कल्पवृक्ष, कल्पतरु. इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक वेल म्हणजे कल्पलता. या सर्व शब्दांमागे 'क्लृप' हा धातू आहे. क्लृप म्हणजे कल्पना करणे. 'क्लृप्ती' म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी लढवलेली कल्पना (जुगाड). कल्प म्हणजे चार अब्ज बत्तीस कोटी वर्षे असाही अर्थ आहे. कल्पांत म्हणजे जगाचा प्रलय. (वेदांच्या सहा अंगांपैकी एकास 'कल्प' असे नाव आहे.) कल्पनेची भरारी घेणारे असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्द...

20. आजचा शब्द 'मय'.

इमेज
  मय 'मय' म्हणजे कशाने तरी भरलेला किंवा कशाचा तरी बनलेला. अनेक शब्दांना शेवटी लागणारा हा एक प्रत्यय आहे. जलमय, तेजोमय हे आपल्या ओळखीचे शब्द. पण मृद् म्हणजे माती. मातीपासून बनलेला तो मृद् + मय. संधीनियमाने तो 'मृण्मय' होतो. त्याचे स्त्रीलिंगी रूप 'मृण्मयी'. चित् म्हणजे विचार, बुद्धी, चैतन्य.  चित् + मय हा शब्दही संधीच्या नियमाने 'चिन्मय' होतो. चिन्मय म्हणजे चैतन्याने भरलेला. त्याचे स्त्रीलिंगी रूप चिन्मयी. कुणी एखाद्या विषयात तल्लीन झाला तर त्याला तद् + मय म्हणजेच 'तन्मय' म्हणतात.  वाक् म्हणजे वाणी. लेखक, कवींच्या वाणीतून झरलेले वाक् + मय म्हणजेच वाङ्‌मय, साहित्य. माणसाच्या अस्तित्वाचे पाच कोष असतात, असे योगशास्त्र सांगते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष. संत तुकारामांचा एक अभंग आहे... 'विष्णुमय' जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।। रामायणातील एका श्लोकात 'सुवर्णमयी' असा शब्द सापडतो. अपि 'सुवर्णमयी' लंका न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिः स्वर्गादपि गरीयसी।। (मय हे एका प्राचीन वास्तुशास्त्रज्ञाचे नाव अस...

19. आजचा शब्द 'याम'.

इमेज
  याम याम म्हणजे दाब, निग्रह, सोशिकपणा. आ उपसर्ग लागून याचा 'आयाम' होतो. आयाम म्हणजे लांबी, विस्तार आणि निग्रह. विषयाचे विविध पैलू म्हणजे आयाम. एखाद्या व्यक्तीला अनेक पैलू असतील तर तिला आपण 'बहुआयामी व्यक्तिमत्त्व' म्हणतो. योगशास्त्रानुसार श्वासाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण. त्या प्राणाचा निग्रह म्हणजे 'प्राणायाम.  'आयाम'ला वि उपसर्ग लागून 'व्यायाम' होतो. (ज्याचा आपल्याला फार कंटाळा असतो.) हातपाय लांब करून, ताणून शरीराचा योग्य आकारात विस्तार करणे म्हणजे 'व्यायाम'. व्यायाम म्हणजे उद्योग, श्रम असेही अर्थ आहेत. याम या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे प्रहर. प्रहर म्हणजे तीन तासांचा काळ. चोवीस तासात आठ प्रहर असतात म्हणजेच आठ याम असतात.  संत गोरा कुंभार चोवीस तास विठ्ठलनामात दंग असत. म्हणून ते एका अभंगात लिहितात,  "नाम तुझे घेतो गोरा म्हणुनी आठ याम। देह प्रपंचाचा दास सुखे करो काम।।" यामिनी, यामवती, यामिका म्हणजे रात्र. म्हणून पहारेकर्‍यासाठी 'यामिक' असाही शब्द आहे. यम् हा धातू यामागे आहे. संयम, नियम, विनियमन अशा अनेक शब्दांचेही मूळ यम् हा...

18. आजचा शब्द 'चारू'.

इमेज
चारू चारु म्हणजे प्रिय, अनुकूल, सुंदर, देखणा, केशर आणि कुंकू. जेथे जेथे सौंदर्य आहे तेथे तेथे 'चारु' शब्दाचा वापर केलेला दिसतो.  शीला म्हणजे दगड. पण चारुशीला म्हणजे रत्न. रत्न हा दगडच असतो, पण सुंदर दगड. हरणाचे डोळे सुंदर असतात म्हणून त्याला चारुनेत्र, चारुलोचन असे म्हणतात. मृच्छकटिक नाटकाचा नायक 'चारुदत्त' म्हणजे देखणा दत्त. ज्याचे अवयव सुंदर आहे तो 'चारुगात्र'. याचे स्त्रीलिंगी रूप 'चारुगात्री'. जिचे केस सुंदर आहे ती चारुकेशी. याच नावाचा संगीतात एक रागही आहे. द्राक्षाच्या वेलीला चारुफला म्हणतात. अमृतानुभवात 'जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी' अशी ओळ सापडते. 'जो घनश्याम चारुगात्र' असे वर्णन श्रीरामविजय ग्रंथात आहे. कृष्णाने नंदाच्या देव्हार्‍यातला शालिग्राम गिळला तेव्हा 'नंद म्हणे राजीवनेत्रा, शालिग्राम देई चारुगात्रा।' असा संवाद हरिविजय ग्रंथात आहे. 'चारुचंद्र की चंचल किरणे खेल रही थी जल थल में।' अशी मैथिलीशरण गुप्त यांची एक कविता आहे. 'चारुचंद्र की चंचल चितवन' असे एक गाणे 'मनपसंद' या चित्रपटात आहे. (अनिल अंब...

17. आजचा शब्द 'ताप'.

इमेज
ताप ताप म्हणजे उष्णता, दुःख, ज्वर, आपत्ती, संकट. आयुष्यात चुकीचा निर्णय घेतला की, त्याचे परिणाम भोगताना पश्चात् + ताप म्हणजे पश्चात्ताप होतो.  (पश्चात् म्हणजेच 'नंतर'. त्यामुळे 'नंतर पश्चात्ताप झाला' असे म्हणणे चूक आहे.) पश्चात्ताप आणि अनुताप सारखेच. क्रोधाला 'संताप' म्हणतात. तो योग्य कारणासाठी असेल तर 'सात्विक संताप' म्हणतात.  जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तीन ताप सहन करावे लागतात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. यांना त्रिविधताप म्हणतात. अज्ञान, मूर्खपणा, राग, द्वेष, रोग यामुळे स्वतःला होतो तो आध्यात्मिक ताप. शत्रु, प्राणी किंवा इतरांमुळे होतो तो आधिभौतिक ताप. आणि दुष्काळ, भूकम्प, पूर वगैरेमुळे होतो तो आधिदैविक ताप. पराक्रम गाजवला की त्याला 'प्रताप' म्हणतात. (काही उलटेसुलटे काम करून ठेवले की मराठीत उपरोधाने 'प्रताप  करून ठेवले' असे म्हणतात.) तापस म्हणजे तप करणारा तपस्वी. तप करणारी स्त्री असेल तर तिला 'तापसी' म्हणतात. हे एका अभिनेत्रीचेही नाव आहे. तापन किंवा तपन म्हणजे सूर्य. (तपन सिन्हा हे प्रसिद्ध चित्रपट दि...

16. आजचा शब्द 'आशु'.

इमेज
आशु आशु म्हणजे त्वरित, वेगवान, जलद. वकील किंवा मोठ्या अधिकार्‍यांकडे वेगाने लिहिणारे स्टेनोग्राफर असतात. ते ज्या लिपीत लिहितात ती 'आशुलिपी' असते. आशुलिपी म्हणजे शाॅर्टहँड. या लिपीत लिहिणार्‍याला आशुलिपिक म्हणतात. लवकर प्रसन्न होणार्‍याला 'आशुतोष' म्हणतात. हे भोळ्या शंकराचे एक नाव आहे. महाशिवरात्रीला रेडिओचे निवेदक शंकराचा उल्लेख 'भगवान आशुतोष' असा करतात. आशुग किंवा आशुगामी म्हणजे वेगाने जाणारा. हा शब्द बाण, वारा किंवा सूर्य यांच्यासाठी वापरला जातो. गुग्गुळाच्या झाडाला आयुर्वेदात आशुपत्री असे नाव आहे.  वेगाने धावतो म्हणून घोड्याला अश्व म्हणतात. अश्वावर जो स्वार होतो तो अश्विन असतो आणि घोडेस्वारी करणारी महिला असेल तर ती अश्विनी असते. कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम्' नाटकात राजा दुष्यंत हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमातला साधू त्याला आज्ञा देतो, "आशु प्रतिसंहर सायकम्।" म्हणजे पटकन बाण परत घे. एखाद्या औषधाचा परिणाम तत्काळ होत असेल तर त्यास आशुक्रिया म्हणतात. आशु असलेले असे अनेक शब्द आपल्याला साहित्यात दिसतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उ...

15. आजचा शब्द 'वह्'.

इमेज
वह्  वह् या धातूचा मुख्य अर्थ वाहून नेणे.  काळजी घेणे, बाळगणे असेही त्याचे इतर अर्थ आहेत. वह् या धातूपासून वाहन, प्रवाह, वाहिनी असे अनेक शब्द तयार होतात. बसमध्ये तिकिटे फाडून जो आपल्या कर्तव्याचे वहन करतो तो वाहक. म्हणजे कंडक्टर. परि म्हणजे सगळीकडे आणि वहन म्हणजे वाहून नेणे. अर्थात 'परिवहन महामंडळ' म्हणजे सगळीकडे प्रवासी वाहून नेणारे महामंडळ. पुढे वाहत जातो तो प्रवाह. वाहून नेते ती वाहिनी. अनेक वाहने रस्त्यावर आली की ती वाहतूक. 'विवाह' या शब्दातही वह् धातू आहे. नवरीला सासरी मेण्यात बसवून वाहून नेले जात होते. त्यावरून 'विवाह' शब्द रूढ झाला. ज्याच्याशी वैवाहिक संबंधामुळे नाते असते तो वैवाही म्हणजेच 'व्याही'. एखाद्या उंच इमारतीत गेलात तर लिफ्टच्या बाजूला 'उद्वाहन' असे लिहिलेले दिसेल. उद् म्हणजे वर आणि वाहन म्हणजे घेऊन जाणारे साधन.  मात्र बोलावण्यासाठी किंवा अपील करण्यासाठी 'जाहीर आवाहन' करतात. यातही वह् धातू आहेच. कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याचे 'निर्वहन' करण्याची शपथ घेतात. वह् धातूने वाहून नेलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भा...

14. आजचा शब्द 'क्षिप्'

इमेज
क्षिप्  क्षिप् या धातूचा मुख्य अर्थ आहे 'फेकणे.' हा धातू अनेक शब्दांमधून दररोज आपल्या भेटीला येतो. मराठीतील 'शिंपडणे' या क्रियापदामागे क्षिप् धातू आहे. क्षिप् चे क्षेपण होते आणि त्याला प्र लागून 'प्रक्षेपण' होते. उपग्रह आकाशात वेगाने फेकला जातो म्हणून त्याला 'प्रक्षेपण' केले असे म्हणतात. दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रमही लहरींमधून लांबवर फेकले जातात म्हणजेच 'प्रक्षेपित' होतात. एखादे अस्त्र दूरवर फेकून मारा केला जातो तेव्हा त्याला 'क्षेपणास्त्र" म्हणतात. क्षिप् चे भूतकाळ सांगणारे रूप आहे क्षिप्त. ज्या माणसाचे मन एकाच वेळी अनेक दिशांनी धावते तेव्हा तो 'विक्षिप्त' आहे, असे म्हणतात. याउलट जेव्हा मोठा विषय थोडक्यात सांगितला जातो तेव्हा त्याला 'संक्षिप्त' स्वरूप येते. माणूस वेडेवाकडे हातपाय झाडतो तेव्हा त्याला 'अंगविक्षेप' म्हणतात.  एखाद्या जुन्या ग्रंथात आगाऊ लोक स्वतःचा मजकूर घुसवतात तेव्हा त्याला 'प्रक्षिप्त' मजकूर म्हणतात. एखाद्याचे बोलणे मध्येच थांबवले जाते तेव्हा 'आक्षेप' घेणे असे म्हणतात. एखादा ...

31. आजचा शब्द 'चल'

इमेज
  चल  चल म्हणजे अस्थिर, हलणारा, क्षणिक, विनाशी. बाजारात सतत चालते म्हणून पैशाला 'चलन' म्हणतात आणि नोटांना 'चलनी नोटा' म्हणतात. ज्याचे मन अस्थिर असते त्याला 'चंचल' किंवा 'चलचित्त' म्हणतात. चित्रपट म्हणजे चलचित्र. लक्ष्मी कधीच एका ठिकाणी स्थिर नसते म्हणून तिलाही 'चंचला' असे नाव आहे.  जो केवळ चालवतो त्याला 'चालक' म्हणतात, तर जो नीटपणे चालवतो त्याला 'संचालक' म्हणतात. इंग्रजीत ज्याला ऑपरेटर म्हणतात तो 'परिचालक' असतो. जे नियम, रूढी, कायदे सध्या वापरात असतात त्यांना 'प्रचलित' कायदे म्हणतात. 'चलचंचू' हे चकोर पक्षाचे एक नाव आहे. निस् हा उपसर्ग लागून 'निश्चल' असा शब्द बनतो. चलनी नोटा सरकारने बाद केल्या तेव्हा 'निश्चलनीकरण' असा शब्द 'प्रचलित' झाला. अविचल, अचल म्हणजे स्थिर, न हलणारा. त्यामुळे पर्वताला 'अचल' म्हणतात. त्यावरून बर्फाचा पर्वत म्हणजे 'हिमाचल', विंध्य नावाचा पर्वत म्हणजे 'विंध्याचल'.  अरुण हा सूर्याचा सारथी म्हटला जातो. त्याची किरणे भारतात पहिल्यांदा पडतात तो प...

13. आजचा शब्द 'इंद्र'.

इमेज
इंद्र इंद्र म्हणजे राजा, श्रेष्ठ, वरिष्ठ, नायक, मुख्य, पुढारी. यापासून रवींद्र, कवींद्र, फणींद्र अशी अनेक नावे तयार होतात. रवींद्र म्हणजे रवी नावाचा राजा. अर्थात सूर्य. कवींमध्ये श्रेष्ठ तो कवींद्र. फणा काढणार्‍या सापांचा राजा तो फणींद्र. महि म्हणजे पृथ्वी आणि 'महीन्द्र' म्हणजे पृथ्वीचा राजा. या नावाची जीपगाड्या बनवणारी एक कंपनी आहे. महेंद्र आणि महींद्र ही दोन वेगळ्या अर्थाची नावे आहेत. महा + इंद्र हा महेंद्र आहे. याचा अर्थ महान राजा. (त्याच्या बाहूमध्ये बळ असेल तर त्याला महेंद्र बाहूबली म्हणतात.) पंजाबी नावे अमरिंदर, सुरिंदर यामध्येही हा इंद्र आहे. (मात्र मराठीतील 'दलिंदर' या विशेषणाशी 'इंद्र'चा संबंध नाही. त्याचा संबंध दारिद्र्याशी आहे.) इंद्राच्या पत्नीचे नाव शचि. त्यावरून 'शचींद्र" असेही नाव इंद्राला मिळाले. याच शचींद्र चे नंतर शचीन झाले. शेवटी ते 'सचिन' या नावावर येऊन स्थिरावले.  बाकी देवांचा राजा 'देवेंद्र' आणि माणसांचा राजा 'नरेंद्र' हे अर्थ तुम्हाला माहीतच आहेत. इंद्र असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना ...

30. आजचा शब्द 'चय'

इमेज
 चय चय म्हणजे एके ठिकाणी रास करणें, ढीग, एकत्र जमाव , संग्रह, समूह, निवड. संचय, समुच्चय, चयन हे शब्द आपण हिंदी, मराठीत सहज वापरतो. नीटपणे केलेला साठा म्हणजे संचय. सभेने एकमताने घेतलेला निर्णय किंवा शब्दांचे एकत्रिकरण म्हणजे समुच्चय. यात सम् आणि उद् हे दोन उपसर्ग आहेत. चय आणि अपचय एकत्र येऊन शरीरात 'चयापचय' क्रिया घडतात. खाल्लेल्या अन्नाचे जटिल पदार्थात रूपांतर होऊन ऊर्जा साठवली जाते. तिला 'चय' प्रक्रिया म्हणतात.  नंतर या जटिल पदार्थांचे विघटन होऊन जगण्यासाठी ऊर्जा वापरली जाते. तिला 'अपचय' प्रक्रिया म्हणतात. अनेक पर्यायांमधून एक निवडला जातो तेव्हा तो 'निश्चय' होतो. स्वतःविषयी तपशीलवार माहिती दिली जाते तेव्हा तो 'परिचय' होतो. संचय, परिचय, निश्चय यांचे भूतकाळ संचित, परिचित, निश्चित इत्यादी होतात. कर्माचा एक प्रकार 'संचित कर्म' असा आहे. ज्यात कागदपत्रे साठवली जातात तिला 'संचिका' असे सरकारी नाव आहे. संचिका म्हणजे फाइल.  भारतातील लोकांचे पैसे साठवून नंतर गायब झालेल्या कंपनीचे नाव 'संचयनी' होते. हे तुम्हाला आठवत असेलच. या सर्व शब...

12. आजचा शब्द 'रंज'

इमेज
  रंज 'रंज' म्हणजे लाल होणे, रंगवणे, रंगणे, प्रेम करणे.  या धातुपासून बनलेले रंजन, मनोरंजन, अनुरंजन असे अनेक शब्द आपण वापरतो. रंजन म्हणजे रमवणे, संतुष्ट करणे, रंगवणे.  मनोरंजन म्हणजे मनाला रमवणे किंवा रंगवणे. एखादी कलाकृती किंवा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मनाला त्या चित्रपटाचा रंग लागतो. चित्रपट शूरवीरांचा असेल तर आपले मन वीररसाने रंगून जाते. हास्यरसाचा चित्रपट किंवा नाटक असेल तर मन हलकेफुलके होते. रंजक म्हणजे रंग देणारा रंगारी किंवा रक्तचंदन.  रंजन नावाचे एक माजी सरन्यायाधीश आहेत. अधीर रंजन नावाचे एक खासदारही आहेत. रंजनचे स्त्रीलिंगी रूप रंजना.  अनुरंजन म्हणजे मनधरणी करणे. याच 'रंज' धातुपासून 'रंग', 'राग' असे शब्द बनतात आणि एकूणच रागरंग पाहून माणूस आपले वागणे बदलतो. अनुरागचा अर्थही प्रेम, आसक्ती असा होतो. त्याउलट विराग म्हणजे आसक्ती संपणे. मनातून आसक्ती नष्ट झाली की वैराग्य येते. अशा व्यक्तीला 'वैरागी' म्हणजेच बोलीभाषेत 'बैरागी' म्हणतात. रंज या धातुचा भूतकाळ सांगणारे विशेषण आहे 'रंजित'. रंजित म्हणजे रंगलेला. इतिहास जर रक्ताने रं...

11. आजचा शब्द 'अनल'

इमेज
अनल अलम् दुनियेला जाळूनही ज्याचे पोट भरणार नाही तो अनल. अनल म्हणजे अग्नि, पाचकरस, पचनशक्ती. 'दावानल' म्हणजे जंगलात लागणारी आग. म्हणजेच वणवा. 'वडवानल' हा समुद्राच्या पोटातला अग्नि असतो, असे म्हणतात. 'ठाव देऊ नये कोणाला, वडवानल जाळितो समुद्राला.' असा एक वाक्प्रचार मराठीत आहे. कुणाला आश्रय देताना आधी नीट विचार करावा, असा याचा अर्थ. ज्ञानेश्वरीमध्ये 'अनळु' हा शब्द सापडतो.  जैसा उद्यानामाजी अनळु। संचरला देखोनि प्रबळु।  मग क्षणभरी कोकिळु। स्थिरु नोहे।। (जर बागेला मोठी आग लागली तर कोकिळ पक्षी क्षणभरही तेथे थांबणार नाही.) संत एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातही देऊनि उपशम-अनळा । जाळिती क्रोधाचा भुईनळा । असा उल्लेख आढळतो. क्रोधाची आग म्हणजे क्रोधानल, भुकेची आग म्हणजे क्षुधानल, शोकाची आग म्हणजे शोकानल आणि विरहाची आग म्हणजे विरहानल, असे अनेक शब्द साहित्यामध्ये सापडतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. विनोद जैतमहाल 982302...

29. आजचा शब्द 'ईक्षण'

इमेज
  ईक्षण ईक्षण म्हणजे नजर, दृष्टी, डोळा, काळजी घेणे. रोजच्या वापरात हा शब्द इतका सहज मिसळून गेला आहे की, तो दाखवल्याशिवाय दिसत नाही. परीक्षण, निरीक्षण, सर्वेक्षण असे अनेक शब्द ईक्षणवर आधारित आहेत. परि हा उपसर्ग लागून परीक्षा, परीक्षण हे शब्द तयार होतात.  निर् हा उपसर्ग लागून 'निरीक्षण' आणि सर्व + ईक्षण यापासून सर्वेक्षण असे शब्द आपण वापरतो. सर्वेक्षण म्हणजे सर्वांकडे पाहणे.  अधि हा उपसर्ग लागला की 'अधीक्षण' होतो. अधीक्षण म्हणजे वरून लक्ष ठेवणे. त्यामुळे पोलिस दलावर लक्ष ठेवणारा अधिकारी 'पोलिस अधीक्षक' असतो.  'ईक्ष'चे स्त्रीलिंगी रूप ईक्षा. त्याला 'प्रति' हा उपसर्ग लागून 'प्रतीक्षा' (म्हणजे वाट पाहणे), अप लागला की अपेक्षा, उप लागून 'उपेक्षा' आणि सम् लागला की 'समीक्षा' अशी नावे तयार होतात.  (मुळात ईक्ष् धातू दीर्घ असल्यामुळे परीक्षा, निरीक्षण, समीक्षा, प्रतीक्षा वगैरे शब्दांची वेलांटी नेहमी दीर्घच लिहावी. अनेक शिक्षकांनाच हे माहीत नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही माहीत नसते.) काव्यामध्ये 'उत्प्रेक्षा' नावाचा अलंकार अस...

10. आजचा शब्द 'भद्र'

इमेज
भद्र भद्र म्हणजे सुखी, धन्य, श्रेष्ठ, सुंदर, कल्याण. हा शब्द अनेक रूपांमध्ये लोक आजही वापरतात. भद्रा हे त्याचे स्त्रीलिंगी रूप. 'सुभद्रा' हे मुलीचे नाव आपल्या परिचयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत 'मुद्रा भद्राय राजते।' असे वाक्य आहे. 'ही राजमुद्रा कल्याणासाठी विराजमान आहे' असा त्याचा अर्थ. दोन वाईट माणसे एकत्र आली की 'अभद्र युती' झाली असे म्हणतात. मात्र दोन विरोधी विचारांचे राजकीय पक्ष एकत्र आले की इतर पक्ष 'अभद्र युती' अशीच टीका करतात. खुलदाबादचे 'भद्र मारुती' हे देवस्थान भारतात प्रसिद्ध आहे. भद्रसेन राजाच्या भद्रावती नगरीतील हा भद्र मुद्रेतील मारुती आहे. संस्कृतमध्ये 'हे भद्र' म्हणजे 'हे भल्या माणसा'. पूर्वी सभेमध्ये 'भद्र जनहो' असे म्हणायची पद्धत होती. सिंहासनाला भद्रासन असेही म्हणतात.  शिवाचे एक उग्र रूप न्हणजे वीरभद्र आणि त्याची पत्नी भद्रकाली. भद्रा म्हणजे गाय किंवा स्वर्गातील गंगा असेही अर्थ सापडतात. (मात्र पंचांगातील 'भद्रा' हे वेगळेच प्रकरण आहे.) भद्र असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो...

28. आजचा शब्द 'दर्श'

इमेज
  दर्श दर्श म्हणजे पाहणे, दिसणे, पुरावा, अमावास्या. दर्शन, प्रदर्शन, निदर्शन, मार्गदर्शन असे दररोज वापरले जाणारे शब्द आपल्या अतिपरिचयाचे आहेत.  दर्शन म्हणजे दिसणे, पाहणे यासोबतच जाणणे, समजणे, विचार, मत, असेही अर्थ आहेत. त्यावरून तत्त्वज्ञानाला 'दर्शनशास्त्र' असे म्हणतात. (सांंख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही षड्दर्शने आणि बौद्ध, जैन ही नास्तिक दर्शने प्रसिद्ध आहेत.) सुदर्शन म्हणजे देखणा किंवा सहज दिसणारा. वस्तू दाखवण्यासाठी पुढे मांडून ठेवल्या की ते प्रदर्शन होते. एखादी समस्या सरकारला दाखवायची असल्यास 'निदर्शने' केली जातात.  प्रतिबिंब दाखवतो तो 'आदर्श'. आदर्श म्हणजे आरसा किंवा नमुना. एखादा सरकारी प्रकल्प मोठ्या भागात राबवण्यापूर्वी छोट्या भागात त्याची चाचणी घेतात. त्याला 'पथदर्शी प्रकल्प' म्हणतात. (इंग्रजीत तो पायलट प्रोजेक्ट असतो.) ज्या व्यक्तीला पाहून आनंद होतो तिला प्रियदर्शन किंवा प्रियदर्शिनी म्हणतात. 'प्रियदर्शिनी' हे इंदिरा गांधींचे नाव होते. भा. रा. तांबे यांनी 'मावळत्या दिनकरा' या कवितेत सूर्याला 'समदर्...

9. आजचा शब्द 'आशय'.

इमेज
  शब्द काय सांगतात? भाग ९ आशय आशय म्हणजे स्थान, साठा, हेतु. याला जोडून अनेक ओळखीचे तर काही अनोळखी शब्द आज पाहू.  पावसाने तुडुंब भरत असल्यामुळे 'जलाशय' हा शब्द सध्या रोजच भेटतो.  परंतु 'महाशय' मध्ये सुध्दा आशय आहेच. ज्याचे स्थान किंवा हेतु महान आहे तो महाशय.  जठराला हिंदीत आमाशय म्हणतात. आम म्हणजे अर्धवट पचलेले अन्न. जठरात अन्न अर्धवट पचवून पुढे ढकलले जाते म्हणून ते आमाशय. हे अर्धवट पचलेले अन्न पुढे पक्वाशयात येते. हा लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग असतो. येथे अन्न बर्‍यापैकी पचते म्हणून ते पक्वाशय. यकृतातील पित्त साठवते ते पित्ताशय. गर्भाचे स्थान गर्भाशय. तसेच मलाशय, मूत्राशय, कफाशय असे शब्द  आपल्या ओळखीचे आहेत. याशिवाय अग्न्याशय, क्षुद्राशय, दिवाशय, पापाशय, दुष्टाशय असे अनेक अपरिचित शब्दही साहित्यात आढळतात. 'आशय' असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. © विनोद जैतमहाल 9823028332

8. आजचा शब्द 'कांत'

इमेज
शब्द काय सांगतात? भाग ८ कांत कांत म्हणजे प्रिय, पती, सुखदायक, वसंत ऋतू. कांत म्हणजे 'पती' असा अर्थ घेतला तर 'रजनीकांत' म्हणजे रात्रीचा पती 'चंद्र'. अभिनेते रजनीकांत यांना लोक केवळ 'रजनी' म्हणतात. ते बरोबर नाही. कारण रजनी म्हणजे रात्र. निशिकांत नावाचा अर्थही चंद्र असाच आहे. कारण निशा किंवा निशि म्हणजे रात्र. लक्ष्मीचा पती लक्ष्मीकांत, रमेचा पती रमाकांत, उमेचा पती उमाकांत, रुक्मिणीचा पती रुक्मिणीकांत. श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणून श्रीकांत हासुद्धा लक्ष्मीचा पती. शशि म्हणजे चंद्र. शशिकांत आणि चंद्रकांत हे मणी आहेत. चंद्राचे किरण त्यांच्यावर पडले की ते पाझरतात (असे म्हणतात.) कृष्णकांत म्हणजे कृष्णाला प्रिय आहे तो. कांतचे स्त्रीलिंगी रूप कांता. कांता म्हणजे प्रिया किंवा पत्नी. विष्णूकांता, शिवकांता, कृष्णकांता या नावांचे अर्थ तुम्हाला माहीत असतीलच. आणि एका प्रसिद्ध टीव्ही मालिकेचे नाव 'चंद्रकांता' म्हणजे चंद्राची पत्नी रात्र. कांत असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते...

प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट

इमेज
  मन सुद्ध तुझं - भाग ३ (मागील रविवारचा भाग) केमिकल लोच्या - प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट कोंडलेल्या गॅसचा स्फोट झाला तर अख्खी इमारत पाडण्याची शक्ती त्यामध्ये असते. मात्र बुद्धीचा वापर केला तर महिनाभर स्वयंपाकासाठी त्याच गॅसचा वापर करता येतो.  वयात येणार्‍या मुलांचे मनही असे अत्यंत ज्वलनशील सिलिंडर असते.  अशाच एका नववीतल्या मुलीची गोष्ट 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या तिसर्‍या भागात येते. परी नावाची ही मुलगी स्मार्ट असते, पण अक्कल नावाची गोष्ट अजून आलेली नसते. ती अचानक खड्ड्यात पडावी तशी प्रेमात पडते. तिचे आईवडील नेहमीप्रमाणे आकांडतांडव करून बघतात. त्यावर ती आत्महत्येची धमकी देते. आणि मग हे प्रकरण मनाच्या डाॅक्टरकडे येते.  डाॅक्टर त्यांच्या टेबलवर ठेवलेले मेंदूचे माॅडेल परीला दाखवतात आणि तिला सांगतात की, सध्या तिला जे प्रेम वगैरे वाटते आहे ती मेंदूच्या मधल्या भागातून रक्तात मिसळणारी रसायने आहेत. त्यावर बुद्धीचा ताबा ठेवणारा भाग अजून वाढतो आहे. माणूस आणि प्राण्यांमध्येही हा मधला भाग सारखेच काम करतो. त्यामुळे वयाच्या १८व्या वर्षांपर्यंत आपल्याला गाडी चालवण्याचा परवाना म...

7. आजचे शब्द 'अंशु' आणि 'चंड'.

शब्द काय सांगतात भाग ७ अंशु आणि चंड अंशु म्हणजे किरण आणि चंड म्हणजे भयंकर, तीव्र, रागीट, उष्ण. हे दोन्ही शब्द एकत्र येऊन चंडांशु असा समास होतो. चंडांशु म्हणजे सूर्य. (चंड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप चंडा, चंडि किंवा चंडिका. म्हणजे उग्र रूप धारण केलेली स्त्री किंवा देवी.) याच चंड ला प्र हा उपसर्ग लावून प्रचंड हा शब्द बनतो. प्रचंड म्हणजे प्रखर आणि उष्ण. मग 'प्रचंड थंड' असे म्हणणे योग्य आहे का? 'अतिशय थंड' असे म्हणता येईल. माली म्हणजे माळ परिधान केलेला. अंशुमाली म्हणजे किरणांची माळ घालणारा सूर्य. सुधा म्हणजे अमृत. त्यामुळे सुधांशु म्हणजे अमृतकिरणांचा वर्षाव करणारा चंद्र. शीत म्हणजे थंड आणि शीतांशु म्हणजे शीतल किरणांचा चंद्र. हिमांशु म्हणजे बर्फासारखी थंड किरणे असलेला चंद्र आणि अंशुमान म्हणजेही चंद्रच. अंशु आणि चंड असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. © विनोद जैतमहाल 9823028332

6. आजचा शब्द 'ईश'

शब्द काय सांगतात? भाग ६ ईश ईश म्हणजे अधिपती, मालक, नवरा, ताब्यात ठेवणारा, समर्थ.  समासात हा शब्द इतर शब्दांशी जोडला जाऊन वेगवेगळी नावे कशी तयार होतात बघा... रजनीश नावाचे मोठे विचारवंत होऊन गेले. रजनी म्हणजे रात्र. रजनीश म्हणजे रात्रीचा पती. म्हणजेच चंद्र.  गिरीश नावाचे कोण कोण प्रख्यात आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. गिरी म्हणजे पर्वत. गिरीश म्हणजे पर्वताचा मालक. म्हणजे शिवशंकर. बरेच लोक हे नाव 'गिरीष' असे लिहितात. त्याला काही अर्थ नाही. अवनी म्हणजे पृथ्वी. अवनीश म्हणजे पृथ्वीचा पती. म्हणजे राजा. एक प्रसिद्ध वृत्तनिवेदक आहेत रवीशकुमार. रवी म्हणजे सूर्य आणि रवीश म्हणजे सूर्य नावाचा ईश्वर. येथे 'सूर्याचा मालक' असा अर्थ घेता येत नाही. जगत् म्हणजे दुनिया. जगदीश म्हणजे दुनियेचा मालक.  मोहनीश बहल नावाचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. मोहन नावाचा ईश्वर असा त्याचा अर्थ. अंबरीश मिश्र नावाचे एक लेखक आहेत. अंबर म्हणजे आकाश आणि अंबरीश म्हणजे आकाशाचा पती. म्हणजेच सूर्य. बाकी कवीश किंवा कवीश्वर म्हणजे काय याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. ईश शेवटी असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शि...

5. आजचा शब्द 'आढ्य'

शब्द काय सांगतात? भाग ५ आजचा शब्द आढ्य. आढ्य हे विशेषण आहे. आढ्य म्हणजे श्रीमंत, युक्त, संपन्न, भरलेला, मिश्रित. धनाने श्रीमंत असेल तर धनाढ्य. गुणाने श्रीमंत असेल तर गुणाढ्य. (कथासरित्सागर लिहिणारा गुणाढ्य नावाचा एक लेखकही पूर्वी होऊन गेला.)  शत्रू जर आपल्यापेक्षा बळाने जास्त असेल तर त्याला आपण बलाढ्य शत्रू म्हणतो. याच आढ्य ला जोडून संस्कृतमध्ये गर्वाढ्य, वित्ताढ्य, अभिमानाढ्य, क्रोधाढ्य, लोभाढ्य, रोगाढ्य असे अनेक शब्द तयार होतात. आढ्यकुलीन म्हणजे श्रीमंत घरात जन्मलेला. आढ्यचर म्हणजे पूर्वी श्रीमंत असलेला. आढ्यरोग किंवा आढ्यवात हे शब्द संधिवातासाठी आयुर्वेदात वापरले जातात. मराठीत 'आढ्यता' म्हणजे प्रतिष्ठितपणाचा डौल, अहंपणा, गर्व. याच आढ्यता नामाला फारसी भाषेतील खोर असा प्रत्यय जोडून 'आढ्यताखोर' असाही एक शब्द मराठी लोकांनी तयार केला. आढ्य असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. - विनोद जैतमहाल 98230...

4. आजचा शब्द 'हेम'

शब्द काय सांगतात भाग ४ आजचा शब्द 'हेम' हेम म्हणजे सोने. हा शब्द अनेक नावांमध्ये सापडतो.  लता म्हणजे वेल असेल तर हेमलता म्हणजे सोन्याची वेल. हेमांगी म्हणजे सोन्यासारखे अंग असलेली.  हेमांग म्हणजे सोन्यासारखे शरीर असलेला. हेमांग म्हणजे सिंह असाही अर्थ होतो. हेमकांती म्हणजे आंबा, हळद किंवा सोन्यासारखी चमकदार त्वचा. हेमकिरण म्हणजे सोन्याचा किरण.  ज्याच्या पोटात सोने आहे तो हेमगर्भ. हा शब्द सूर्यासाठी वापरला जातो. सोने, पारा आणि गंधकापासून आयुर्वेदात एक औषध बनवले जाते. त्यालाही हेमगर्भ म्हणतात. अगदी मरणाच्या दारात असलेल्या माणसाला हेमगर्भाची मात्रा देतात. या मात्रेने त्याच्यात थोडी धुगधुगी येते. जिच्याकडे बरेच गुण आहेत तिला आपण गुणवती म्हणतो. त्याच नियमाने जिच्याकडे भरपूर सोने आहे तिला हेमवती म्हणतात. हेमवती हे देवी लक्ष्मीचे एक नाव आहे. म्हणून श्रीमंत माणसाला हेमवतीनंदन म्हणतात. म्हणजेच लक्ष्मीपुत्र. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जर माला म्हणजे माळ आणि मालिनी म्हणजे माळ घातलेली स्त्री. तर हेमामालिनी म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आता सहज देऊ शकाल. असे हेमयुक्त अनेक शब्द आत...

3.आजचा शब्द 'अद्रि'

इमेज
 भाग ३ आजचा शब्द अद्रि. अद्रि या शब्दाचा एक अर्थ 'पर्वत' असा होतो. याला पर्वतांची नावे जोडून विन्ध्याद्रि, नीलाद्रि, हिमाद्रि आणि आपल्या सर्वात जवळचा सह्य नावाचा *सह्याद्रि*. सह्याद्रि म्हणजेच *सह्य* नावाचा पर्वत. आपल्याला जर हे माहीत असेल तर आपण 'सह्याद्रि पर्वत' असा चुकीचा उल्लेख करणार नाही.  अद्रि शब्दाला जोडून अद्रिराज म्हणजे हिमालय. अद्रितनया , अद्रिनन्दिनी, अद्रिजा म्हणजे पार्वती.  अद्रिशय्य म्हणजे शिव. अशी अनेक समानार्थी नावे तयार होतात. शेवटी 'अद्रि' असलेले अनेक शब्द आता तुम्हालाही आठवतील. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.  म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. - विनोद जैतमहाल 9823028332

27. आजचा शब्द 'वाद'

इमेज
वाद वाद म्हणजे मत, चर्चा, सिद्धांत, बातमी. संवाद, विवाद, प्रवाद इत्यादी शब्द आपल्या ओळखीचे आहेत. नियमात न बसणार्‍या गोष्टीला अपवाद म्हणतात. पण अपवाद म्हणजे निंदा, ठपका, शिवी, असेही अर्थ आहेत. त्यावरून 'लोकापवाद' असा शब्द वापरला जातो. लोक नेत्याची निंदा करतात तेव्हा त्याला लोकापवादास सामोरे जावे लागते. अशा वेळी 'वादग्रस्त' मुद्दे पुढे आणले जातात. कोर्टात फिर्याद करणारा वादी आणि त्याला उत्तर देणारा प्रतिवादी असतो. सरकारला मोठा न्यायाचा सल्ला देणारा 'महान्यायवादी' म्हणजेच ॲटर्नी जनरल असतो.  एका भाषेतील आशय दुसर्‍या भाषेत नेला की त्याला 'अनुवाद' म्हणतात. नीटपणे साधला तर संवाद, नाही तर 'विवाद' होतोच. वादाचा धुरळा उठतो तेव्हा वादंग माजते. वाद म्हणजे 'आवाज' या अर्थावरून 'वादन' म्हणजे वाजणे असे नाम आणि वाजवता येते ते 'वाद्य' असे (कर्मणि विध्यर्थक धातुसाधित) विशेषण तयार होते.  सिद्धांत किंवा मत या अर्थानुसार मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद, स्त्रीवाद, भांडवलवाद, असे अनेक शब्द वेगवेगळे 'इझम' घेऊन येतात. अनेक ग्रंथ वाचून एखादा ...

26. आजचा शब्द 'धान'

इमेज
  26 शब्दांची श्रीमंती अनुभवा... धान धान म्हणजे स्थान, ठिकाण. यावरून परिधान, अवधान, संधान, प्रधान असे अनेक शब्द तयार होतात. वि हा उपसर्ग लागला की 'विधान' शब्द तयार होतो. विधान म्हणजे रचना, व्यवस्था, नियम, कायदा. जेथे कायदा घडवला जातो ती 'विधानसभा'. सम् हा उपसर्ग 'व्यवस्थित' या अर्थाने वापरला जातो. त्यावरून 'संविधान' हा शब्द बनतो. व्यवस्थित बनवलेला कायदा म्हणजे 'संविधान'.  धान ला अन्तर् लागून तो 'अन्तर्धान' होतो. म्हणजे अदृश्य होतो. अनु व सम् हे दोन्ही उपसर्ग लागून 'अनुसंधान' म्हणजे 'संशोधन' असा अर्थ होतो. निधान म्हणजे ठेवा, खजिना. सुखनिधान म्हणजे सुखाचा ठेवा. वि आणि अव हे  दोन उपसर्ग लागले की 'व्यवधान'. म्हणजे अडथळा. इतिहासात 'संधान बांधणे' असा शब्दप्रयोग करतात. संधान म्हणजे जोडणे, तह करणे. मात्र 'समाधान' म्हणजे शांत करणे. ईश्वरसंन्निधान म्हणजे ईश्वराच्या जवळ जाणे, ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वरावर मन जडवणे. हे शब्द विशेषकरून अध्यात्मात दिसतात.  धानचे स्त्रीलिंगी रूप 'धानी'. राजाचे स्थान म्हणजे ...

2. आजचा शब्द 'अक्षि'

इमेज
भाग २ (आजचा शब्द अक्षि) अक्षि म्हणजे डोळा.  याचा इतर शब्दांशी समास झाला की शेवटी 'अक्ष' होतो.  उदाहरणार्थ कमलाक्ष म्हणजे कमळासारखे डोळे असलेला.  कमलाक्षी म्हणजे कमळासारखे डोळे असलेली. विशालाक्ष म्हणजे मोठे डोळे असलेला. विशालाक्षी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप. रुद्राक्ष म्हणजे रुद्राचा डोळा. एकाक्ष म्हणजे एक डोळा असलेला (कावळा). कटाक्ष म्हणजे दृष्टि टाकणे किंवा तिरप्या नजरेने पाहणे. हरिणाक्षी म्हणजे हरणासारखे डोळे असलेली. मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असलेली. याच चालीवर एखाद्या पुरुषाचे डोळे हरणासारखे किंवा माशासारखे असतील तर त्याला 'हरिणाक्ष' किंवा 'मीनाक्ष' असेही म्हणता येईल. वरील शब्दांकडे पाहताना तुमची दृष्टी आता नक्कीच बदलली असेल.  शेवटी 'अक्ष' असलेले अनेक शब्द आता तुम्हाला आठवतील. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात.  आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. ज्ञानाचे तेज आपल्या डोळ्यांत चमकू लागते. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. विनोद जैतमहाल 9823028332 ***

1. आजचा शब्द 'आकर'

इमेज
शब्द काय सांगतात? भाग १ 'आकर' आकर या शब्दाचे अर्थ खाण, उत्पत्तिस्थान, समूह असे आहेत. याला रत्न हा शब्द जोडला की 'रत्नाकर' हा समास होतो. रत्नाकर म्हणजे रत्नांचा खजिना. हा शब्द समुद्रासाठी वापरला जातो. 'आकर'लाच पद्म हा शब्द जोडून पद्माकर म्हणजे कमळांनी भरलेले तळे असा अर्थ होतो. यालाच 'करुणा' हा शब्द जोडून 'करुणाकर' म्हणजेच करुणेची खाण हा शब्द ईश्वरासाठी वापरला जातो. यालाच 'प्रभा' हा शब्द जोडून 'प्रभाकर' हे नाव बनते. प्रभा म्हणजे तेज, कांती, किरण. आणि प्रभाकर म्हणजे तेजाची खाण. हा शब्द सूर्यासाठी वापरला जातो. वरील शब्दांकडे पाहण्याची तुमची दृष्टी आता बदलली असेलच. शेवटी 'आकर' असलेले अनेक शब्द आता तुम्हालाही आठवतील. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. - विनोद जैतमहाल. संस्कृत वर्गाचा डेमो व्हिडिओ आणि अधिक माहितीसाठी संपर्कः 9823028332 Whatsapp. ***