34. आजचा शब्द 'भव'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भव म्हणजे उत्पन्न होणारा, उत्पत्ति, संसार, जग इत्यादी.
संसाराच्या सागराला 'भवसागर', 'भवसिंधू' म्हणतात. संत नामदेवांनी तर 'भवमूळव्याध' असा या जगाचा उल्लेख केला आहे.
ज्याने जगात येऊन अनेक कामे केली त्याला 'अनुभव' आहे असे म्हणतात. जिंकण्यापासून दूर झाला तर त्याचा 'पराभव' होतो. 'विभव' म्हणजे सामर्थ्य, संपत्ती. ज्याच्याकडे हे दोन्ही आहेत त्याच्याकडे 'वैभव' असते.
(विजेच्या दाबाला 'विभवांतर' असे नाव आहे. त्याला इंग्रजीत पोटेन्शिअल डिफरन्स किंवा व्होल्टेज म्हणतात. भारतात हे सामान्यपणे 230 व्होल्ट असते.) सम् उपसर्गाने 'संभव', संभाव्य', 'संभावित' अशी शक्यता व्यक्त होते. समस्या 'उद्भवली' असे म्हणतात तेव्हा उद् हा उपसर्ग लागलेला असतो.
बर्फाचे पाणी होते तेव्हा 'द्रवीभवन', द्रवाची वाफ होते तेव्हा 'बाष्पीभवन' आणि पाण्याचा बर्फ होतो तेव्हा 'घनीभवन' होते.
गुरू नानकदेवांनी बीजमंत्रात 'निर्भव' असा शब्द उच्चारला आहे. 'निर्भव' म्हणजे जो या जगातील सर्व समस्यांतून मुक्त आहे तो. संत कबीरांनीही 'निर्भव के घर बजावहि तूर।' असे लिहिले आहे.
भव म्हणजे शंकर. भवाची पत्नी भवानी. (तशी शिवाची पत्नी शिवानी.) भव्य, भवितव्य आणि भविष्य ही विशेषणे आपल्या ओळखीची आहेत.
भवचा भूतकाळच 'भूत' आहे. भूत म्हणजे 'झालेला'. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ, भूतपूर्व, अभूतपूर्व हे शब्द आपण वापरतो. भूत म्हणजे जन्मलेला प्राणी. भूतदया म्हणजे सर्व प्राण्यांवर दया करणे. भूतनाथ हे शंकराचे एक नाव. भव म्हणजे 'व्हावे'. त्यामुळे आशीर्वाद देताना 'शतायुषी भव', 'यशस्वी भव' असे म्हणतात.
पंचमहाभूतांच्या रूपात 'भव' आपल्याला सर्वत्र वेढून आहेच. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
सुंदर लेख.
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 🙏
उत्तर द्याहटवा