11. आजचा शब्द 'अनल'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अनल
अलम् दुनियेला जाळूनही ज्याचे पोट भरणार नाही तो अनल. अनल म्हणजे अग्नि, पाचकरस, पचनशक्ती.
'दावानल' म्हणजे जंगलात लागणारी आग. म्हणजेच वणवा. 'वडवानल' हा समुद्राच्या पोटातला अग्नि असतो, असे म्हणतात.
'ठाव देऊ नये कोणाला, वडवानल जाळितो समुद्राला.'
असा एक वाक्प्रचार मराठीत आहे. कुणाला आश्रय देताना आधी नीट विचार करावा, असा याचा अर्थ.
ज्ञानेश्वरीमध्ये 'अनळु' हा शब्द सापडतो.
जैसा उद्यानामाजी अनळु। संचरला देखोनि प्रबळु।
मग क्षणभरी कोकिळु। स्थिरु नोहे।।
(जर बागेला मोठी आग लागली तर कोकिळ पक्षी क्षणभरही तेथे थांबणार नाही.)
संत एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवरातही
देऊनि उपशम-अनळा । जाळिती क्रोधाचा भुईनळा ।
असा उल्लेख आढळतो.
क्रोधाची आग म्हणजे क्रोधानल, भुकेची आग म्हणजे क्षुधानल, शोकाची आग म्हणजे शोकानल आणि विरहाची आग म्हणजे विरहानल, असे अनेक शब्द साहित्यामध्ये सापडतात.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा