महाजनांचा मार्ग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
औरंगाबादला एका लग्नाला गेलो होतो. रात्रीची वेळ होती. नवरदेवाला घोड्यावरून मिरवणे सुरू होते. समोर बँड आणि फटाके दोन्हींचा दणदणाट सुरू होता. तेवढ्यात एक ठिणगी उडाली आणि घोड्याला लागली. घोड्याने समोरचे दोन्ही पाय वर करून नवरदेवाला जागीच उताणे पाडले आणि घोडा उधळला. पुढे घोड्याने दोन रिक्षांना धडका दिल्या आणि चेतक चौकात एका मोठ्या वाहनाला धडकून तो घोडा मेला.
इकडे लहानशा करवलीसह नवरदेवाला उचलून दवाखान्यात नेले. सगळे वर्हाडी त्यांच्यामागे धावले. तासाभराने मलमपट्ट्यांवर मुंडावळी लावून नवरदेव आला आणि लग्न एकदाचे लागले.
जर त्या दिवशी घोड्यासोबत नवरदेवही फरफटत गेला असता तर नवरी लग्नाआधीच विधवा झाली असती. 'अपशकुनी' असे म्हणून तिचीही आयुष्यभर फरफट झाली असती.
हिंगोलीत एका बाळानेही नुकताच आपला एक डोळा फटाक्यामुळे गमावला आहे.
दरवर्षी फटाक्यांमुळे अनेक लोक विनाकारण जीव गमावतात.
दिवाळी हा जर प्रकाशाचा उत्सव असेल तर त्यात फटाक्यासारख्या बेसूर आणि भेसूर वस्तूचे काय काम?
लग्न आणि निवडणुकीतील विजय हे जर आनंदाचे प्रसंग असतील तर त्यात फटाक्याच्या लडींची बेताल तडतड कशाला?
आनंदच साजरा करायचा तर दिवाळी पहाटसारखे 'दिवाळी दुपार', 'दिवाळी संध्याकाळ' असे सांस्कृतिक कार्यक्रम करणे अशक्य आहे का?
फटाक्यांचा शोध चीनने लावला. फटाके चिनी आहेत. आदर्श भारतीय संस्कृतीशी आणि कोणत्याच धर्माशी या चिनी उत्पादनाचा काहीही संबंध नाही.
धर्माचे पावित्र्य भंग करणारा फटाका आधी धर्मगुरूंनी नाकारावा. तरच सामान्य माणसे त्या मार्गावरून चालतील.
महाभारताच्या वनपर्वात युधिष्ठिराचे एक वचन आहे...
महाजनो येन गतः स पन्थाः।
"समाजातील महान माणसे ज्या मार्गाने जातात तोच मार्ग श्रेष्ठ आहे", असे युधिष्ठिर सांगतो.
मात्र महाजनांचाच मार्ग चुकत असेल तर तेथे गूगल मॅप तरी काय करील ?
- विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Barobar aahe sir
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 🙏
हटवा