78. आजचा शब्द 'निवेश'.
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात.
या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी.
या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात.
नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक.
उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्द 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अनेकदा वापरण्यात आला आहे.) मराठीत आपण अशा परकीय सत्तेला 'वसाहतवादी सत्ता' म्हणतो.
प्र हा उपसर्ग वेश ला लावून प्रवेश होतो. प्र हा उपसर्ग 'पुढे' या अर्थाने वापरला जातो.
परिवेश असाही एक शब्द याच धातूला परि हा उपसर्ग लावून बनतो. परिवेश म्हणजे आजूबाजूचे वातावरण, परीघ, वेष्टण इत्यादी.
आवेश म्हणजे मनात उग्र भावना निर्माण झाल्यानंतरची स्थिती. अभि हा उपसर्ग लावून अभिनिवेश असा एक शब्द वापरला जातो. अभिनिवेश म्हणजे एखाद्या विषयात तल्लीन होण्याची अवस्था. परंतु मराठीत हा शब्द अहंकार, अभिमान या अर्थाने वापरला जातो.
विश् याच धातूपासून विश हे नाम तयार होते. विश म्हणजे मनुष्य, व्यापारी, प्रजा. यावरून व्यापार्यासाठी वैश्य असा शब्द आपल्याला माहीतच आहे. वस्तू विकण्यासाठी घेऊन बसणारा तो वैश्य.
जेथे हे सगळे जग वसलेले आहे त्याला आपण 'विश्व' म्हणतो. यामागेही विश् हाच धातू आहे. या विश्वाचे भरण करतो तो विश्वम्भर आणि पृथ्वी जिवांचे भरण-पोषण करते म्हणून तिला विश्वम्भरा म्हणतात. विश्वाचे पालन करणारे म्हणून सूर्य आणि चंद्राला 'विश्वपा' म्हणतात.
विश म्हणजे प्रजा असा अर्थ घेतला तर विशाम्पति म्हणजे राजा असा एक शब्द आहे.
अशा प्रकारे विश् हा धातू अनेकविध अर्थांत सापडतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा