78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

20. आजचा शब्द 'मय'.

 


मय


'मय' म्हणजे कशाने तरी भरलेला किंवा कशाचा तरी बनलेला. अनेक शब्दांना शेवटी लागणारा हा एक प्रत्यय आहे.

जलमय, तेजोमय हे आपल्या ओळखीचे शब्द. पण मृद् म्हणजे माती. मातीपासून बनलेला तो मृद् + मय. संधीनियमाने तो 'मृण्मय' होतो. त्याचे स्त्रीलिंगी रूप 'मृण्मयी'.

चित् म्हणजे विचार, बुद्धी, चैतन्य. 

चित् + मय हा शब्दही संधीच्या नियमाने 'चिन्मय' होतो. चिन्मय म्हणजे चैतन्याने भरलेला. त्याचे स्त्रीलिंगी रूप चिन्मयी. कुणी एखाद्या विषयात तल्लीन झाला तर त्याला तद् + मय म्हणजेच 'तन्मय' म्हणतात. 

वाक् म्हणजे वाणी. लेखक, कवींच्या वाणीतून झरलेले वाक् + मय म्हणजेच वाङ्‌मय, साहित्य.

माणसाच्या अस्तित्वाचे पाच कोष असतात, असे योगशास्त्र सांगते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष.

संत तुकारामांचा एक अभंग आहे...

'विष्णुमय' जग वैष्णवांचा धर्म।

भेदाभेद भ्रम अमंगळ।।

रामायणातील एका श्लोकात 'सुवर्णमयी' असा शब्द सापडतो.

अपि 'सुवर्णमयी' लंका न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिः स्वर्गादपि गरीयसी।।

(मय हे एका प्राचीन वास्तुशास्त्रज्ञाचे नाव असल्याचे उल्लेख सापडतात. पांडवांची मयसभा यानेच बांधली होती.)

मय हा प्रत्यय लागलेले अनेक शब्द आपण वापरतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.