12. आजचा शब्द 'रंज'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रंज
'रंज' म्हणजे लाल होणे, रंगवणे, रंगणे, प्रेम करणे.
या धातुपासून बनलेले रंजन, मनोरंजन, अनुरंजन असे अनेक शब्द आपण वापरतो.
रंजन म्हणजे रमवणे, संतुष्ट करणे, रंगवणे.
मनोरंजन म्हणजे मनाला रमवणे किंवा रंगवणे. एखादी कलाकृती किंवा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मनाला त्या चित्रपटाचा रंग लागतो. चित्रपट शूरवीरांचा असेल तर आपले मन वीररसाने रंगून जाते. हास्यरसाचा चित्रपट किंवा नाटक असेल तर मन हलकेफुलके होते.
रंजक म्हणजे रंग देणारा रंगारी किंवा रक्तचंदन.
रंजन नावाचे एक माजी सरन्यायाधीश आहेत. अधीर रंजन नावाचे एक खासदारही आहेत. रंजनचे स्त्रीलिंगी रूप रंजना.
अनुरंजन म्हणजे मनधरणी करणे. याच 'रंज' धातुपासून 'रंग', 'राग' असे शब्द बनतात आणि एकूणच रागरंग पाहून माणूस आपले वागणे बदलतो.
अनुरागचा अर्थही प्रेम, आसक्ती असा होतो. त्याउलट विराग म्हणजे आसक्ती संपणे. मनातून आसक्ती नष्ट झाली की वैराग्य येते. अशा व्यक्तीला 'वैरागी' म्हणजेच बोलीभाषेत 'बैरागी' म्हणतात.
रंज या धातुचा भूतकाळ सांगणारे विशेषण आहे 'रंजित'. रंजित म्हणजे रंगलेला. इतिहास जर रक्ताने रंगलेला असेल तर त्याला 'रक्तरंजित इतिहास' म्हणतात.
एखादी गोष्ट जास्तच रंगवून सांगितली असेल तर तिला 'अतिरंजित' कहाणी म्हणतात.
रंज या धातुचा रंग लागलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
***
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा