78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

19. आजचा शब्द 'याम'.

 


याम


याम म्हणजे दाब, निग्रह, सोशिकपणा.

आ उपसर्ग लागून याचा 'आयाम' होतो. आयाम म्हणजे लांबी, विस्तार आणि निग्रह.

विषयाचे विविध पैलू म्हणजे आयाम. एखाद्या व्यक्तीला अनेक पैलू असतील तर तिला आपण 'बहुआयामी व्यक्तिमत्त्व' म्हणतो.

योगशास्त्रानुसार श्वासाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण. त्या प्राणाचा निग्रह म्हणजे 'प्राणायाम. 

'आयाम'ला वि उपसर्ग लागून 'व्यायाम' होतो. (ज्याचा आपल्याला फार कंटाळा असतो.) हातपाय लांब करून, ताणून शरीराचा योग्य आकारात विस्तार करणे म्हणजे 'व्यायाम'. व्यायाम म्हणजे उद्योग, श्रम असेही अर्थ आहेत.

याम या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे प्रहर. प्रहर म्हणजे तीन तासांचा काळ. चोवीस तासात आठ प्रहर असतात म्हणजेच आठ याम असतात. 

संत गोरा कुंभार चोवीस तास विठ्ठलनामात दंग असत. म्हणून ते एका अभंगात लिहितात, 

"नाम तुझे घेतो गोरा म्हणुनी आठ याम।

देह प्रपंचाचा दास सुखे करो काम।।"

यामिनी, यामवती, यामिका म्हणजे रात्र. म्हणून पहारेकर्‍यासाठी 'यामिक' असाही शब्द आहे.

यम् हा धातू यामागे आहे. संयम, नियम, विनियमन अशा अनेक शब्दांचेही मूळ यम् हा धातू आहे.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.