23. आजचा शब्द 'न्यास'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
न्यास
न्यास म्हणजे खूण, निशानी, ठसा, छाप, ठेव (डिपाॅझिट), त्याग करणे, खाली ठेवणे, रेखाटन करणे.
नृत्य करणारी व्यक्ती ज्या लालित्याने जमिनीवर पाय ठेवते त्यास 'पदन्यास' म्हणतात.
चालण्याची शैली किंवा वाक्यात शब्दांची व्यवस्थित रचना करणे म्हणजे पदविन्यास.
इमारत बांधण्यापूर्वी पहिला दगड ठेवणे म्हणजे 'शिलान्यास'.
कोणत्याही लिपीत शाईने कागदावर अक्षरे उमटवली की तो 'लिपिन्यास' होतो.
अर्थांतरन्यास नावाचा एक अलंकार कवितेत वापरला जातो. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे ठेवणे. एक विशिष्ट अर्थ दुसर्या अर्थाकडे नेऊन ठेवला की तो अर्थांतरन्यास अलंकार होतो. 'कठिण समय येता कोण कामास येतो' ही कविता अर्थांतरन्यास अलंकाराचे उदाहरण आहे. (नलोपाख्यान- रघुनाथ पंडित)
न्यास म्हणजे ट्रस्ट. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय त्यासाठीच असते.
ज्या व्यक्तीकडे इतरांच्या ठेवी असतात तिला न्यासधारी म्हणतात आणि ज्या व्यक्तीने सर्व ठेवी बाजूला सारल्या तिने 'संन्यास' घेतला असे म्हणतात.
न्यासचा भूतकाळ 'न्यस्त' आणि संन्यासचा भूतकाळ 'संन्यस्त'. एखादे कार्य वरून परोपकाराचे दिसत असले तरी त्यामागे स्वार्थ लपलेला असेल तर त्याला 'न्यस्त स्वार्थ' म्हणतात. म्हणजे मनात ठेवलेला स्वार्थ.
राग गाताना ज्या स्वरावर जास्त वेळ थांबतात (विश्रांती/ जास्त ठहराव) करतात त्यास 'न्यासस्वर' असे म्हणतात.
ज्या स्वरावर गाणे संपते त्यालाही 'न्यासस्वर' म्हणतात.
'न्यास' असलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा