78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

26. आजचा शब्द 'क्रम'.

 



क्रम

क्रम म्हणजे चालणे, जाणे, उडी मारणे, व्यापणे, पाऊल.

नियमापेक्षा जास्त जागा व्यापली की 'अति' हा उपसर्ग लागून याचे 'अतिक्रमण' होते. साथीचा रोग समाजात पसरला की 'संक्रमण' होते. हल्ला केला की 'आक्रमण' होते. हल्ल्यात शौर्य गाजवले की 'पराक्रम' होतो. पराक्रम म्हणजे उद्योग असाही अर्थ आहे. हे दोन्ही शब्द मराठीत कधी कधी उलट अर्थानेही वापरले जातात. 'पराक्रम किंवा उद्योग करून ठेवले' या वाक्यात ती नकारात्मक छटा दिसते. 

विशेष उंची गाठली की 'विक्रम' होतो. विक्रम करणारा सूर्यासारखा तेजस्वी असेल तर त्याला 'विक्रमादित्य' म्हणतात. (चक्रासारखी ज्याची बुद्धी भिरभिरते त्याला मराठीत 'चक्रम' म्हणतात. त्याचा 'क्रम' या शब्दाशी काही संबंध नाही.)

एखाद्या गोष्टीभोवती एकेक पाऊल टाकत फिरले की 'परिक्रमा' होते. उत् म्हणजे वर. उत्क्रमण म्हणजे वर जाणे. प्राण वर गेले की त्याला 'प्राणोत्क्रमण' म्हणतात. एकानंतर एक रचना केली की तिला 'अनुक्रम' म्हणतात. पुस्तकात पहिल्या पानावर 'अनुक्रमणिका' दिलेली असते. अभ्यासक्रम, क्रमिक पुस्तके, क्रमाचा अंक म्हणजे क्रमांक हे शब्द आपल्या वापरातले आहेत.

एखादे कार्य ज्या क्रमाने पूर्ण होणार आहे त्याला 'कार्यक्रम' म्हणतात. (शिकार टप्प्यात आल्यावर जो केला जातो त्याला राजकारणाच्या भाषेत 'कार्यक्रम' म्हणतात.)

असे अनेक शब्द आपण 'क्रमवार' वापरतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.


विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.