14. आजचा शब्द 'क्षिप्'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्षिप्
क्षिप् या धातूचा मुख्य अर्थ आहे 'फेकणे.'
हा धातू अनेक शब्दांमधून दररोज आपल्या भेटीला येतो. मराठीतील 'शिंपडणे' या क्रियापदामागे क्षिप् धातू आहे. क्षिप् चे क्षेपण होते आणि त्याला प्र लागून 'प्रक्षेपण' होते. उपग्रह आकाशात वेगाने फेकला जातो म्हणून त्याला 'प्रक्षेपण' केले असे म्हणतात. दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रमही लहरींमधून लांबवर फेकले जातात म्हणजेच 'प्रक्षेपित' होतात.
एखादे अस्त्र दूरवर फेकून मारा केला जातो तेव्हा त्याला 'क्षेपणास्त्र" म्हणतात.
क्षिप् चे भूतकाळ सांगणारे रूप आहे क्षिप्त. ज्या माणसाचे मन एकाच वेळी अनेक दिशांनी धावते तेव्हा तो 'विक्षिप्त' आहे, असे म्हणतात. याउलट जेव्हा मोठा विषय थोडक्यात सांगितला जातो तेव्हा त्याला 'संक्षिप्त' स्वरूप येते.
माणूस वेडेवाकडे हातपाय झाडतो तेव्हा त्याला 'अंगविक्षेप' म्हणतात.
एखाद्या जुन्या ग्रंथात आगाऊ लोक स्वतःचा मजकूर घुसवतात तेव्हा त्याला 'प्रक्षिप्त' मजकूर म्हणतात. एखाद्याचे बोलणे मध्येच थांबवले जाते तेव्हा 'आक्षेप' घेणे असे म्हणतात. एखादा संपादक जर सतत अभ्यास, संशोधन आणि कामात व्यग्र असेल तर त्याला 'साक्षेपी' संपादक म्हटले जाते.
अधिक्षेप म्हणजे अपराध, आरोप करणे, निक्षेप म्हणजे मुक्काम करणे, अशा अनेक रूपांमध्ये हा धातू समोर येतच राहतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा