25. आजचा शब्द 'नय'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नय
नय म्हणजे जाणे, आचरण, मुत्सद्देगिरी, न्याय, नीति.
याला विविध उपसर्ग लागून अभिनय, राजनय, अनुनय असे अनेक शब्द तयार होतात. एखाद्या विशिष्ट मनःस्थितीकडे घेऊन जाणे म्हणजे अभिनय.
राजकीय मुत्सद्देगिरी म्हणजे राजनय. राजनय करणार्याला राजनयिक म्हणतात. 'नय'चा एक अर्थ नीति. त्यापासून 'राजनीति' हा शब्द तयार झाला.
अनुनय म्हणजे विनंती, मन वळवणे. परि हा उपसर्ग लागला की 'नय'चे परिणय होते. परिणय म्हणजे विवाह. 'नयन' म्हणजे नेणे किंवा दाखवणे. त्यामुळेच डोळ्याला नयन म्हणतात. हिंदीत त्याचे 'नैन' झाले. गुरुजवळ शिष्याला नेण्याचा संस्कार म्हणजे उपनयन. विनय, प्रणय, निर्णय असे अनेक शब्द आपल्याला माहीत आहेत.
नय म्हणजे जाणे किंवा घेऊन जाणे. त्यावरून लोकांना विशिष्ट दिशेला नेतो तो नायक किंवा लोकनायक. तो जर अधिकृत असेल तर 'अधिनायक'. (राष्ट्रगीतामधील हा चौथा शब्द आहे.) नायक जर विशेष असेल तर 'विनायक'. मोठा असेल तर महानायक. दुष्ट असेल तर खलनायक. रघुकुळातील असेल तर रघुनायक. यदुकुळातील असेल तर यदुनायक. गौतम बुद्धांचे एक नाव 'नायक' असे आहे. नाईक, नाईकवाडे, सरनाईक ही आडनावे 'नायक'पासूनच बनली आहेत. नायकी कानडा हा संगीतातील एक राग आहे.
नायकचे स्त्रीलिंगी रूप 'नायिका'. मात्र 'नायकीण' या शब्दाला वेगळा अर्थ आहे. ती कामगार स्त्रियांची प्रमुख किंवा कलावंतीण असते.
या सर्वांचा धातू नी-नय् असा आहे. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा