30. आजचा शब्द 'चय'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चय
चय म्हणजे एके ठिकाणी रास करणें, ढीग, एकत्र जमाव , संग्रह, समूह, निवड.
संचय, समुच्चय, चयन हे शब्द आपण हिंदी, मराठीत सहज वापरतो.
नीटपणे केलेला साठा म्हणजे संचय. सभेने एकमताने घेतलेला निर्णय किंवा शब्दांचे एकत्रिकरण म्हणजे समुच्चय. यात सम् आणि उद् हे दोन उपसर्ग आहेत.
चय आणि अपचय एकत्र येऊन शरीरात 'चयापचय' क्रिया घडतात. खाल्लेल्या अन्नाचे जटिल पदार्थात रूपांतर होऊन ऊर्जा साठवली जाते. तिला 'चय' प्रक्रिया म्हणतात.
नंतर या जटिल पदार्थांचे विघटन होऊन जगण्यासाठी ऊर्जा वापरली जाते. तिला 'अपचय' प्रक्रिया म्हणतात.
अनेक पर्यायांमधून एक निवडला जातो तेव्हा तो 'निश्चय' होतो. स्वतःविषयी तपशीलवार माहिती दिली जाते तेव्हा तो 'परिचय' होतो. संचय, परिचय, निश्चय यांचे भूतकाळ संचित, परिचित, निश्चित इत्यादी होतात. कर्माचा एक प्रकार 'संचित कर्म' असा आहे.
ज्यात कागदपत्रे साठवली जातात तिला 'संचिका' असे सरकारी नाव आहे. संचिका म्हणजे फाइल.
भारतातील लोकांचे पैसे साठवून नंतर गायब झालेल्या कंपनीचे नाव 'संचयनी' होते. हे तुम्हाला आठवत असेलच.
या सर्व शब्दांमागे 'ची' हा धातू आहे. त्यापासून हिंदीत 'चुनाव' हा शब्द बनला आहे.
'चय'ने निवडलेले असे अनेक शब्द आपण रोज वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
- विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा