78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

40. आजचा शब्द 'आवली'.

 


आवली म्हणजे रांग, ओळ किंवा माळ.

आवलीसोबत येणारे सर्वात जास्त ओळखीचे शब्द म्हणजे दीपावली आणि रंगावली. दिव्यांची रांग म्हणजे दीपावली हे आता सर्वांनाच माहीत आहे. 'रंगावली'चे मराठीत रांगोळी झाले. (आणि सर्वनाश होतो तेव्हा 'राखरांगोळी' होते.)

गाण्यातील पदांची रचना म्हणजे पदावली. किंवा बीजगणितातील राशी आणि बेरीज, वजाबाकी वगैरे चिन्हांची रांगसुद्धा 'पदावली' असते. 

मुंड म्हणजे डोके. मुंडावली म्हणजे डोक्याला लग्नात बांधतात ती सुशोभित माळ. मराठीत तिला मुंडावळी, मंडोळी वगैरे म्हणतात. 

बारामतीचे पंडित कवी मोरेश्वर पराडकर अर्थात मोरोपंत यांच्या एका काव्यसंग्रहाचे नाव 'केकावली' आणि दुसरा 'संशयरत्नावली' आहे. काळे ढग पाहून पावसासाठी मोर जो टाहो फोडतो त्याला 'केका' म्हणतात आणि कवीचे नाव मोरोपंत. त्यामुळे 'केकावली' हे नाव सार्थ ठरते. रत्नावली म्हणजे रत्नांची माळ. (संत तुलसीदासांच्या पत्नीचे नाव रत्नावली होते. सातव्या शतकातील हर्ष नावाच्या राजाने 'रत्नावली' नावाचे मोठे मनोरंजक नाटक लिहिले आहे. त्यातील नायिका रत्नावली श्रीलंकेची राजकुमारी असते.)

अंगावर रोमांच उभे राहिले की 'रोमावली' म्हणतात. कमळांची माळ म्हणजे पद्मावली.

इतिहासातील घटना ज्या वर्षी घडल्या त्या वर्षांच्या यादीला आपण सनावळी म्हणतो. इंग्रजी वर्षाला इसवी सन म्हटले जाते. यातील 'सन' म्हणजे वर्ष. हा 'सन' अरबी शब्द आहे. त्याचा संस्कृतमधील 'आवली'सोबत समास होऊन मराठीत 'सनावळी' असा शब्द तयार झाला असावा असा अंदाज आपण करू शकतो. (पण भुतावळ, खानावळ, फळ-फळावळ हे शब्द कसे तयार झाले असावेत? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे.)

आवली सोबत रांगेत बसलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

  1. अत्यन्त उपयोगी, नियमितपने मिळणारी माहीती ज्ञान वृद्धी करीता आवश्यक।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.