78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

38. आजचा शब्द 'वेद'.

वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, जाणीव, जाणणे. 

त्यावरून 'वेदना' या शब्दाचा अर्थही ज्ञान किंवा पीडा असा होतो. डोके दुखत असेल तरच आपल्याला 'डोके' असल्याची जाणीव होते. (इतर वेळी फारसा संबंध नसतो.) जेथे वेदना होतात तोच भाग आपल्याला जास्त जाणवतो. सम् उपसर्ग लागला की 'संवेदना' होते. संवेदना म्हणजे चेतना, भावना. इतरांच्या वेदना पाहून संवेदनशील मन भावुक होते. 

आवेदन आणि निवेदन या शब्दांतही 'वेद' आहेच. आवेदन म्हणजे अर्ज. निवेदन म्हणजे जाहीरपणे सांगणे, अर्पण करणे. त्यावरून 'निवेद्य' म्हणजे अर्पण करण्याजोगा पदार्थ. त्याचे नामरूप आहे 'नैवेद्य'. (याचे बोलीभाषेतील रूप 'निवद'. काटकुळ्या माणसाला 'मरीआईचा निवद' म्हणतात. )

विद् हा धातू या सर्व शब्दांमध्ये समान आहे. विद् म्हणजे ज्ञान. ज्याच्याकडे विद् आहे तो विद्वान. जी ज्ञान देते ती विद्या. जो विद्येची इच्छा करतो तो विद्यार्थी. जो खूप शिकला आहे तो 'सुविद्य'. वैद्य या नामातही विद् हाच धातू आहे. वैद्य म्हणजे विद्वान मनुष्य किंवा डाॅक्टर. 

'वेदि' म्हणजे यज्ञकुंड किंवा वेद जाणणारा पंडित. ऋक्, यजुः, साम, अथर्व हे चार वेद जाणणार्‍याचे आडनाव चतुर्वेदी असते. त्रिवेदी, द्विवेदी ही आडनावेही तशीच. वेदांच्या अन्ती येणारा उपनिषद इत्यादी भाग म्हणजे 'वेदान्त'. (मात्र 'निर्वेद' म्हणजे खेद, नाउमेद.)

वेदांग म्हणजे वेदांच्या अध्ययनासाठी आवश्यक सहा अंगे. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, छन्द आणि निरूक्त यांना वेदांग म्हणतात. बाकी "वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा", असे संत तुकाराम का म्हणाले हे तुम्हाला माहीतच आहे.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332


टिप्पण्या

  1. दररोज शब्दाचे नवीन ज्ञान प्राप्त होत आहे. धन्यवाद सर!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.