38. आजचा शब्द 'वेद'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, जाणीव, जाणणे.
त्यावरून 'वेदना' या शब्दाचा अर्थही ज्ञान किंवा पीडा असा होतो. डोके दुखत असेल तरच आपल्याला 'डोके' असल्याची जाणीव होते. (इतर वेळी फारसा संबंध नसतो.) जेथे वेदना होतात तोच भाग आपल्याला जास्त जाणवतो. सम् उपसर्ग लागला की 'संवेदना' होते. संवेदना म्हणजे चेतना, भावना. इतरांच्या वेदना पाहून संवेदनशील मन भावुक होते.
आवेदन आणि निवेदन या शब्दांतही 'वेद' आहेच. आवेदन म्हणजे अर्ज. निवेदन म्हणजे जाहीरपणे सांगणे, अर्पण करणे. त्यावरून 'निवेद्य' म्हणजे अर्पण करण्याजोगा पदार्थ. त्याचे नामरूप आहे 'नैवेद्य'. (याचे बोलीभाषेतील रूप 'निवद'. काटकुळ्या माणसाला 'मरीआईचा निवद' म्हणतात. )
विद् हा धातू या सर्व शब्दांमध्ये समान आहे. विद् म्हणजे ज्ञान. ज्याच्याकडे विद् आहे तो विद्वान. जी ज्ञान देते ती विद्या. जो विद्येची इच्छा करतो तो विद्यार्थी. जो खूप शिकला आहे तो 'सुविद्य'. वैद्य या नामातही विद् हाच धातू आहे. वैद्य म्हणजे विद्वान मनुष्य किंवा डाॅक्टर.
'वेदि' म्हणजे यज्ञकुंड किंवा वेद जाणणारा पंडित. ऋक्, यजुः, साम, अथर्व हे चार वेद जाणणार्याचे आडनाव चतुर्वेदी असते. त्रिवेदी, द्विवेदी ही आडनावेही तशीच. वेदांच्या अन्ती येणारा उपनिषद इत्यादी भाग म्हणजे 'वेदान्त'. (मात्र 'निर्वेद' म्हणजे खेद, नाउमेद.)
वेदांग म्हणजे वेदांच्या अध्ययनासाठी आवश्यक सहा अंगे. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, छन्द आणि निरूक्त यांना वेदांग म्हणतात. बाकी "वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा", असे संत तुकाराम का म्हणाले हे तुम्हाला माहीतच आहे.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
अफाट ज्ञान आहे सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 🙏
हटवाFar chhan chhan lijata tumhi sir
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 🙏
हटवादररोज शब्दाचे नवीन ज्ञान प्राप्त होत आहे. धन्यवाद सर!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 🙏
हटवा