63. आजचा शब्द 'सद्'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सद् हा एक धातू आहे. त्याचा अर्थ बसणे, बुडणे, नष्ट होणे, खचणे, निराश होणे.
सदन म्हणजे घर किंवा आसन. जेथे लोकप्रतिनिधी बसतात आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करतात तेही 'सदन' असते. लोकसभा, राज्यसभा ही सदनाची उदाहरणे. येथे खासदारांनी नीट बसून कामकाज करावे असे अपेक्षित असते म्हणून सम् + सद् = 'संसद' असा शब्द वापरला जातो. (मात्र तेथे नीट बसण्याऐवजी गोंधळ घालण्यात अनेक खासदारांना रस असतो.) सदस् म्हणजे सभा आणि सभेत बसण्यासाठी जे लायक असतात ते सदस्य. एखाद्या संस्थेच्या सभेला बसण्यास पात्र असतात ते त्या संस्थेचे 'सभासद' असतात.
देशाचे कामकाज पाहणारी जशी 'संसद' असते तशी शहराची व्यवस्था पाहणारी नगर 'परिषद' असते. यात परि हा उपसर्ग सद् या धातूला लावलेला आहे. मात्र सद् च्या पूर्वी इ आल्यामुळे 'षद' असे रूपांतर झाले आहे. (तसा नियम आहे.) परिषद म्हणजे चहूबाजूंनी बसलेल्या लोकांची सभा. नगर परिषदेत बसण्यास पात्र असलेल्या व्यक्तींना 'पार्षद' (किंवा नगरसेवक) म्हणतात.
परिषद प्रमाणेच 'उपनिषद' या शब्दातही सद् धातू आहे. गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणजे 'उपनिषद' असे म्हटले जाते.
बुडणे, निराश होणे या अर्थाने सद् धातूचे 'साद' हे नाम आहे. त्यावरून 'अवसाद' असा शब्द हिंदीत वापरतात. अवसाद म्हणजे नैराश्य. प्रसाद आणि विषाद या शब्दांमध्येही 'साद' हे नाम दिसते.
सद् चे भूतकाळ सांगणारे रूप 'सन्न' असे आहे. त्याला प्र उपसर्ग लागून 'प्रसन्न' असे विशेषण बनते. वि उपसर्ग लावला की 'विषण्ण' असे विशेषण तयार होते. (यात सन्न च्या पूर्वी इ आल्यामुळे 'ष' आला आणि 'ष' आल्यामुळे बाणाचा 'ण' आला, असे बदल होतात. व्याकरणाच्या जंगलात अशी नियमांची रेलचेल असते.)
'आसन्न' म्हणजे जवळ पोचलेला. आसन्नमरण म्हणजे मृत्यूच्या दारात पोचलेला. किंवा याला 'मरणासन्न' असेही म्हणतात.
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति। असे अर्जुन गीतेमध्ये म्हणतो. यातील सीदन्ति हा सद् धातूचा साधा वर्तमानकाळ आहे. "माझे हातपाय गळून जात आहेत आणि तोंड कोरडे पडत आहे" असा या वाक्याचा अर्थ.
सद् हा धातू अनेक शब्दांमध्ये असा लपून बसलेला दिसतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा