62. आजचा शब्द 'अशन'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अशन म्हणजे खाणे, भक्षण करणे, चाखणे किंवा अन्न.
यामागील धातू अश् आहे. या धातूचा अर्थ व्यापणे, शिरकाव करणे, मिळवणे, उपभोगणे.
अशन म्हणजे खाणे आणि प्र+अशन= प्राशन. प्राशन करणे म्हणजे चाखणे, खाणे. च्यवन ऋषींनी आवळा व इतर जडीबुटींपासून बनवलेले चाखण्यायोग्य औषध म्हणजेच प्राश. त्यालाच आपण 'च्यवनप्राश' म्हणतो. हे प्राश खाऊन च्यवन ऋषींनी वृद्धावस्थेवर मात केली होती असा उल्लेख सापडतो.
अशन म्हणजे खाणे आणि 'अनशन' म्हणजे उपाशी राहणे. हिंदी भाषेत उपोषणासाठी 'अनशन' शब्द वापरला जातो. प्राश किंवा आश म्हणजे अन्न असाही अर्थ आहे. त्यावरून सकाळचे अन्न म्हणजे 'प्रातराश' म्हणजेच ब्रेक फास्ट आणि सायंकाळचे जेवण म्हणजे 'सायमाश' (डिनर) असे शब्द साहित्यात सापडतात.
अग्नीला हुताश, हुताशन किंवा आश्रयाश अशी नावे आहेत. अग्नीच्या आश्रयाला जो जातो त्यालाच अग्नी खाऊन टाकतो. म्हणून त्याला आश्रयाश म्हणतात. ज्या ज्या वस्तूंची अग्नीत आहुती दिली जाते त्या वस्तूही तो खाऊन टाकतो म्हणून त्याला हुताश किंवा हुताशन म्हणतात. 'हुताशन'चे स्त्रीलिंगी रूप हुताशनी. फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून त्यात सर्व विकारांची आहुती द्यावी, असा संकेत आहे. त्यामुळे या पौर्णिमेला 'हुताशनी पौर्णिमा' म्हणतात.
गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की,
यत् करोषि यत् अश्नासि यत् जुहोसि ददासि यत् ।
यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम् ।।
"हे कौन्तेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस ते मला अर्पण कर." यात अश्नासि म्हणजे 'तू खातोस' हे (नवव्या गणातील अश् धातूचे मध्यम पुरुषी एकवचनी) क्रियापद आले आहे.
अशन किंवा आश हे शब्द असे विविध रूपांमध्ये आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
- विनोद जैतमहाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा