61. आजचा शब्द 'या'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
'या' हा एक धातू आहे. या म्हणजे वाहन, जाणे, ताब्यात ठेवणे, पोहचणे इत्यादी.
'यात' हे त्याचे भूतकाळ सांगणारे रूप आहे. 'यात' म्हणजे गेलेला. त्याविरुद्ध आयात म्हणजे आलेला (माल). निर् हा उपसर्ग लागून 'निर्यात' असा शब्द आपण देशातून बाहेर पाठवलेल्या मालासाठी वापरतो.
ज्यावर किंवा ज्यामध्ये बसून प्रवास करता येईल ते 'यान' असते. यात घोडा, गाढव, हत्ती, उंट, कार इत्यादी सर्वांचाच समावेश होतो. अवकाशात जाण्यासाठी अंतराळयान वापरले जाते. बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखांची नावे महायान आणि हीनयान अशी आहेत. वेगाने पुढे जाण्यासाठी प्र हा उपसर्ग लावून 'प्रयाण' असा शब्द वापरला जातो. मृत्यूला 'महाप्रयाण' असे म्हणतात. मृत्यूसाठी 'निर्याण' असाही एक शब्द आहे. निर्याण म्हणजे निर्वाण. उद् हा उपसर्ग लावला की 'यान'चे उद्यान होते. उद्यान म्हणजे बाहेर जाणे. बाग, उपवन असेही उद्यान शब्दाचे अर्थ आहेत.
'या' धातूपासून यात्रा असा एक शब्द प्रवासाकरिता वापरला जातो. मराठीत यात्रेकरू आणि हिंदीत यात्रीगण अशी अनेकवचने प्रवाशांसाठी आहेत. तीर्थाच्या ठिकाणी जायचे असेल तर तीर्थयात्रा. यात आणि आयात मिळून यातायात असा एकच शब्द मराठी व हिंदीत थोडा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. यातायात म्हणजे जाणे-येणे. परंतु मराठीत या जाण्या-येण्याचा त्रास झाला तरच 'यातायात' करावी लागली, असे म्हणतात.
'या' धातूचे प्रयोजक रूप 'यापन' आहे. यापन म्हणजे घालवणे. जीवन घालवणे म्हणजे 'जीवनयापन' करणे. एखादे व्रत समाप्तीकडे घेऊन जाणे म्हणजे 'उद्यापन' करणे.
'या' धातूपासून यायी असे एक विशेषण बनते. यायी म्हणजे जाणारा. नेत्याच्या किंवा संताच्या मागे जाणारा त्याचा 'अनुयायी' असतो.
'या' हा धातू अशाप्रकारे अनेक उपसर्ग व प्रत्ययांसोबत जातच राहतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा