78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

59. आजचा शब्द 'गत'.



गत म्हणजे गेलेला, संपलेला, मरण पावलेला, आश्रय केलेला, पोचलेला. 

हे गम् धातूचे भूतकाळ सांगणारे विशेषण आहे. यापूर्वी ४६व्या भागात गत विशेषणासोबत येणारे काही शब्द आपण पाहिले. बाकीचे परंतु काही महत्त्वाचे शब्द आज पाहू. 

मृत व्यक्तीला आपण 'दिवंगत' म्हणतो. 'दिव' म्हणजे आकाश किंवा स्वर्ग. 'दिवंगत' म्हणजे स्वर्गात गेलेला, स्वर्गवासी. एखाद्या विषयात प्रवीण असलेल्या व्यक्तीला 'पारंगत' म्हणतात. पार म्हणजे पलीकडे. पारंगत म्हणजे त्या विषयातील सर्व ज्ञान ओलांडून पलीकडे गेलेला. एखादी संस्था वाढत जाते तेव्हा ती 'वृद्धिंगत' झाली असे आपण म्हणतो.

पंचतंत्रात एका श्लोकात गतानुगतिक असा शब्द सापडतो.

गतानुगतिक लोको न लोकः पारमार्थिकः।

स्वतःची बुद्धी न वापरता इतरांचे आंधळेपणाने अनुकरण करणारे लोक 'गतानुगतिक' असतात.

सुगत आणि तथागत ही भगवान बुद्धांची नावे आहेत. सुगत म्हणजे योग्यप्रकारे मोक्ष प्राप्त झालेले. तथागत म्हणजे (पूर्वीच्या बुद्धांप्रमाणे) त्याच मार्गावरून तसेच क्रमण केलेले.

गतसत्त्व, गतप्राण म्हणजे मृत होणे. गतवयस्, गतायुष म्हणजे आयुष्य संपत आलेली फार वृद्ध व्यक्ती. अंतर्गत म्हणजे आतला, आपसातला. भूमिगत होणे म्हणजे तळघरात लपून राहणे. गतप्राय म्हणजे जवळपास गेल्यात जमा असलेला. जुन्या काळातले वैभव आठवले की त्या गतवैभवाच्या आठवणी ठरतात. 

गत हे भूतकाळ सांगणारे धातूसाधित विशेषण सतत अनेक शब्दांतून गतकाळ दाखवत राहते. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.