58. आजचा शब्द 'वृ'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वृ या धातूचे अनेक अर्थ आहेत. आच्छादणे, वरणे, निवडणे.
ज्याचे लग्न ठरते त्याला 'वर' म्हणतात. कारण त्याला वरलेले असते म्हणजेच निवडलेले असते. वराला देण्यायोग्य कन्येला 'उपवर' कन्या म्हणतात. आ हा उपसर्ग लागून 'आवरण' असा शब्द तयार होतो. आवरण म्हणजे झाकण. अनेक वस्तू गोळा करून त्यावर झाकण घातले की त्याला मराठीत 'आवरणे' असे म्हणतात आणि पडण्यापासून वाचणे म्हणजे 'सावरणे'.
वृ या धातूचे भाववाचक नाम 'वार' असे होते. त्याला परि हा उपसर्ग लागला की 'परिवार' शब्द बनतो. घरातील लोक मनुष्याला चहूबाजूंनी वेढून असतात म्हणून त्या कुटुंबाला 'परिवार' म्हणतात. मात्र माणसाला संकटाने वेढले की त्याचे 'निवारण' करण्याचा उपाय शोधला जातो.
दुर्गादेवीच्या आरतीमध्ये
वारी वारी जन्म मरणाते वारी
हारी पडलो आता संकट 'निवारी'
अशी आळवणी केलेली आहे.
आवरण म्हणजे झाकणे असा अर्थ आपण पाहिला. त्याउलट अर्थाचा शब्द आहे 'विवरण'. विवरण म्हणजे झाकलेला विषय उलगडून तपशीलवार सांगणे.
वर या विशेषणाचे श्रेष्ठ, चांगला असेही अर्थ आहेत. त्याला प्र हा उपसर्ग लागून 'प्रवर' असे विशेषण बनते. प्रवर म्हणजे अधिक श्रेष्ठ, उत्कृष्ट, मुख्य. विष्णूधर्मोत्तरपुराण नावाच्या ग्रंथात 'कलानां प्रवरं चित्रम्। असे वाक्य आहे. चित्रकला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे.
प्रवरचे स्त्रीलिंगी रूप आहे प्रवरा. हे एका नदीचे नाव आहे. श्रेष्ठ नदी असा त्याचा अर्थ होतो.
आवरण म्हणजे आच्छादन आणि त्याला पुन्हा प्र उपसर्ग लावून 'प्रावरण' असा शब्द बनतो. प्रावरण म्हणजे 'भारी किमतीचे कापड'. कापड दुकानाच्या जाहिरातीत 'वस्त्र-प्रावरण' असे शब्द त्यामुळेच दिसतात.
आवरणला परि उपसर्ग लागून परि+आवरण= 'पर्यावरण' असाही शब्द तयार होतो. या पृथ्वीला सर्व बाजूंनी वाताचे आवरण आहे म्हणून त्याला 'वातावरण' म्हणतात.
वृ धातूने वरलेल्या अशा अनेक शब्दांनी आपल्याला वेढलेले आहे. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा