57. आजचा शब्द 'अरि'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अरि म्हणजे शत्रु हे आता जवळपास सर्वांनाच माहीत आहे. तरी हा शब्द या लेखमालिकेत असला पाहिजे.
अरिजित, अरिंदम म्हणजे शत्रूला जिंकणारा. अरिसूदन, अरिमर्दन म्हणजे शत्रूचा नाश करणारा, अरिभद्र म्हणजे मोठा शत्रू. मुर नावाच्या दैत्याचा शत्रू म्हणजे मुरारि. हे कृष्णाचे एक नाव आहे. शंकराचा अवतार असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे एक नाव मल्हारि मार्तंड असेही आहे. खंडोबाने मल्लासुराचा संहार केला म्हणून मल्लारि किंवा मल्हारि असे नाव पडले असावे.
शत्रूचे दमन करणार्यास अरिकर्षण म्हणतात. चुकीच्या निर्णयाने स्वतःचा घात करून शत्रूला आनंद देणार्या व्यक्तीला 'अरिनंदन' किंवा 'शत्रुनंदन' असे नाव आहे.
(नंदन म्हणजे आनंद देणारा किंवा पुत्र. आनंद देणार्या वनाला 'नंदनवन' म्हणतात.)
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहा शत्रूंची ज्याने हत्या केली त्याला 'अरिहंत' म्हणतात. अरिहंतांनाच इतरांना उपदेश करण्याचा अधिकार असतो. अरिकुल म्हणजे शत्रूंचा जमाव. शत्रूविषयी विचार करून आपल्या देशाचे धोरण ठरवण्यास अरिचिंतन म्हणतात. अरिचिंतन म्हणजे परराष्ट्रीय राजकारण. त्रिपुरासुराचा शत्रू म्हणून शंकराला त्रिपुरारि म्हणतात.
अरिष्ट म्हणजे संकट, दारू, शत्रू किंवा ताक. वनस्पतींच्या काढ्यापासून जे औषध बनवले जाते त्याला अरिष्ट म्हणतात. अरिष्ट बनवण्याची प्रक्रिया दारू बनवण्यासारखीच असते. अर्जुनारिष्ट, अभयारिष्ट, तक्रारिष्ट इत्यादी अरिष्टे आयुर्वेदिक उपचारांत प्रसिद्ध आहेत.
अरि शब्दासह शत्रुत्वदर्शक असे अनेक शब्द आपल्या परिचयाचे आहेत. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा