78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

56. आजचा शब्द 'मान्'.

 


आधीच्या भागात आपण वान् हा प्रत्यय व त्याला जोडून येणारे शब्द पाहिले होते. आजचा मान् हा सुद्धा एक ओळखीचा प्रत्यय आहे. याचा उपयोगही मालकी किंवा स्वामित्व दाखवण्यासाठी केला जातो.

ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धिमान्. ज्याच्याकडे शक्ती आहे तो शक्तीमान्.  

श्री म्हणजे संपत्ती, शोभा, बुद्धी, लक्ष्मी, वैभव. हे सर्व ज्याच्याकडे आहे त्यालाच आपण 'श्रीमान्' म्हणतो. भिकार्‍याकडे कितीही पैसे असले तरी त्याला आपण श्रीमान् म्हणत नाही.

हनु म्हणजे हनुवटी किंवा जबडा. ज्याची हनुवटी मोठी आहे  तो हनुमान्. ब्रह्मांड पुराणात मतिमान्, श्रुतिमान्, केतुमान्, गतिमान्, धृतिमान् अशी हनुमानाच्या भावांची नावे दिलेली आहेत. (मति म्हणजे बुद्धी, श्रुती म्हणजे कान किंवा वेद, केतु म्हणजे चमक किंवा ध्वज आणि धृती म्हणजे स्थैर्य, संतोष.) जो दीर्घायुषी आहे तो आयुष्मान्. ज्याची कीर्ती चहूकडे पसरलेली आहे तो कीर्तिमान्. (मुळात हा मत् प्रत्यय आहे.)

'मंत' हा सुद्धा मालकी दाखवणारा पुल्लिंगी प्रत्यय आहे. त्यावरून बुद्धिमंत, शक्तिमंत, श्रीमंत, हनुमंत अशी विशेषणे बनतात.

मालकी दाखवणारा स्त्रीलिंगी प्रत्यय आहे 'मती'. 

श्रीमान् चे स्त्रीलिंगी रूप श्रीमती. जिच्याकडे संपत्ती, शोभा, बुद्धी, लक्ष्मी, वैभव आहे तिलाच 'श्रीमती' म्हणतात.

मती हाच प्रत्यय जोडून शक्तिमती, बुद्धिमती, यशोमती अशी स्त्रीलिंगी विशेषणे तयार होतात.

मान्, मंत आणि मती हे प्रत्यय जोडून मालकी दाखवणारे असे अनेक शब्द आपल्याला भेटतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.