55. आजचा शब्द 'वान्'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज एक अतिशय ओळखीचा प्रत्यय आपण पाहणार आहोत. प्रत्यय शब्दांच्या शेवटी लागलेले असतात. वान् हा एक स्वामित्व किंवा मालकी दाखवणारा प्रत्यय आहे. ज्या पुरुषाकडे गुणांची मालकी आहेत तो गुणवान्. ज्याच्याकडे धन आहे तो धनवान्. याच प्रकारे रूपवान्, भाग्यवान्, दयावान्, बलवान्, प्रतिभावान्, शीलवान्, क्रियावान्, क्षमावान्, चरित्रवान्, विचारवान् अशा असंख्य विशेषणांमध्ये वान् हा प्रत्यय लागलेला दिसतो. (हा मुळात 'वत्' असा प्रत्यय आहे.)
विद् म्हणजे ज्ञान ज्याच्याकडे आहे तो विद्वान.
भग म्हणजे सुदैव, उत्कर्ष, कीर्ती, भरभराट, यश, सौंदर्य, मोक्ष. हे सगळे ज्याच्याकडे आहे तो 'भगवान.'
(भगवा या शब्दाशी 'भगवान्'चा संबंध नाही.)
'एकच प्याला' या नाटकात 'कशी या त्यजु पदाला, मम 'सुभग' शुभ पदाला।' असे पद आहे. यात 'सुभग' असा शब्द येतो. सुभग म्हणजे भाग्यवान्, सुंदर, प्रिय, मधुर.
हिम म्हणजे बर्फ. त्यामुळे हिमालय पर्वताला हिमवान् असेही नाव आहे.
'वंत' असाही प्रत्यय मालकी दाखवणारा आहे. तो वरील सर्व शब्दांना लावता येईल. जसे कलावंत, गुणवंत, धनवंत, भाग्यवंत, दयावंत, बलवंत, प्रतिभावंत, विचारवंत, भगवंत इत्यादी.
वान् याच अर्थाचा स्त्रीलिंगी प्रत्यय 'वती' हा आहे. जिच्याकडे गुण आहेत ती गुणवती, जिच्याकडे रूप आहे ती रूपवती, जिच्याकडे शील आहे ती शीलवती इत्यादी.
याच नियमाने भगवान् चे स्त्रीलिंगी रूप 'भगवती' असे होते. जिच्याकडे 'भग' म्हणजे सुदैव, उत्कर्ष, कीर्ती, भरभराट, यश, सौंदर्य, मोक्ष इत्यादी आहे ती 'भगवती'.
याच नियमाने भाग्यवती, कलावती यांच्यासोबतच प्रतिभावती, विचारवती, धनवती, बलवती असेही स्त्रीलिंगी शब्द वापरता येतात. 'हेमवती' हे पार्वतीचे एक नाव आहे. हेमवतीचा मुलगा हेमवतीनंदन.
वान् आणि वती हे प्रत्यय अनुक्रमे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी विशेषणे बनवण्यासाठी वापरले जातात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा