78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

54. आजचा शब्द 'अंबर'

 

अंबर म्हणजे आकाश, अंतरिक्ष, अंतराळ, वस्त्र, झगा, केशर.

आकाशात रत्नाप्रमाणे चमकतो म्हणून सूर्याचे 'अंबरमणि' असे एक नाव आहे. फार उंच किंवा आकाशाला भिडलेली इमारत, पर्वत असेल तर त्याला 'अंबरलेखी' म्हणतात. देवासाठी 'अंबरौकस्' असे एक नाव आहे. औकस् म्हणजे घर आणि आकाशात ज्याचे घर आहे तो 'अंबरौकस्'. 

आकाश जेथे संपल्यासारखे वाटते त्या क्षितिजाला 'अंबरान्त' म्हटले जाते. परंतु अंबर म्हणजे 'वस्त्र' असा अर्थ घेतला तर अंबरान्त म्हणजे पदराचे टोक, असाही अर्थ होतो. 

पीत म्हणजे पिवळे आणि अंबर म्हणजे वस्त्र. यावरून पीतांबर म्हणजे पिवळे वस्त्र असा अर्थ आपल्याला माहीतच आहे. (पण काही जण 'पिवळा पीतांबर' असेही चुकून म्हणतात.) पिवळे वस्त्र परिधान करणारे म्हणून विष्णू, कृष्ण किंवा संन्याशांना 'पीतांबर' म्हणतात. पिवळी फुले येणार्‍या एका वनस्पतीचे नावही 'पीतांबरी' आहे. या वनस्पतीचा उपयोग त्वचा व पोटाच्या विकारांवर उपचारांसाठी होतो.

नीलांबर म्हणजे निळे वस्त्र किंवा निळे वस्त्र नेसलेली व्यक्ती. हे बलराम, शनिग्रह आणि एका राक्षसाचे नाव आहे. जैन धर्मात दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ आहेत. जे साधू पांढरे वस्त्र परिधान करतात ते श्वेतांबर आणि दाही दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे ते दिगंबर. दिगंबरचा शब्दशः अर्थ नग्न असा आहे. शिवशंकरालाही दिगंबर म्हणतात. 'अव्यक्त' असाही दिगंबर शब्दाचा एक अर्थ आहे. त्यामुळे दत्त दिगंबर म्हणजे अव्यक्त ब्रह्म असा अर्थ घ्यावा लागतो.

चर्मांबर म्हणजे कातड्याचे वस्त्र. वाघाचे कातडे म्हणजे व्याघ्रचर्मांबर. हत्तीचे कातडे म्हणजे गजचर्मांबर. ही दोन्ही वस्त्रे शंकराच्या कंबरेला आहेत, असे वर्णन साहित्यात आढळते.

श्लथ म्हणजे ढिले, अस्ताव्यस्त पसरलेले. श्लथांबर म्हणजे लांबलचक, ढिले वस्त्र. रस्ता झाडत चालणारे वस्त्र म्हणजे श्लथांबर. यावरून मराठीत 'लटांबर' असा शब्द आला. एखाद्याच्या मागे त्याची अनेक छोटी मुले चालत येत असतील तर त्याला मराठीत 'लटांबर' म्हणतात.

अंबर हा शब्द असा अनेक अर्थ घेऊन वावरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

#संस्कृत #शब्द #अंबर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.