53. आजचा शब्द 'सत्' (भाग २)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आधीच्या भागात आपण पाहिले की, सत् हे एक विशेषण आहे. त्याचा अर्थ असणारा, खरा, चांगला, साधू, योग्य, ब्रह्म.
आता या विशेषणाला जोडून येणारे इतर सामासिक शब्द पाहू. कर्म चांगले असेल तर सत्कर्म, चरित्र चांगले असेल तर सत् आणि चरित्र मिळून 'सच्चरित्र', वर्तन चांगले असेल तर सद्वर्तन. कुणी शीलवान असेल तर सत् + शील = सच्छील असा बदल होतो. 'सत्य' हे विशेषण आणि 'सत्त्व' हे नामही सत् पासूनच बनते. सत्त्व म्हणजे प्राण, प्राणी, खरेपणा इत्यादी. कागदपत्रांचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी ती सत्यापित म्हणजे अटेस्टेड केली जातात. अस्तित्व या अर्थाने 'सत्ता' हे स्त्रीलिंगी नाम सत् पासून तयार होते. आपले अस्तित्व दाखवण्याचा संघर्ष म्हणजे 'सत्तासंघर्ष' असतो. सत् ला त्र हे अव्यय लागले की 'सत्त्र' हे नाम बनते. लिहिताना मात्र ते 'सत्र' असे होते. सत्र म्हणजे अनेक दिवस अनेकांनी मिळून केलेला यज्ञ. उदाहरणार्थ जनमेजयाचे सर्पसत्र, प्रथम सत्र, चर्चासत्र, अन्नसत्र इत्यादी. अन्नसत्रचे नंतर अन्नछत्र झाले.
सत् म्हणजे साधू आणि सती म्हणजे साध्वी. सत्पाल म्हणजे राजा किंवा चांगले दूध देणारी गाय अथवा म्हैस. आनन म्हणजे चेहरा. सदानन म्हणजे चमकदार चेहरा असलेली व्यक्ती. दान करताना ज्याला खरोखर आवश्यकता आहे त्यालाच दान केले जाते. दानासाठी पात्र असलेल्या व्यक्तीस 'सत्पात्र' म्हणतात. साधू लोकांच्या म्हणजे चांगल्या लोकांच्या सोबत राहिले की तो 'सत्संग' होतो. योग्य मार्ग असेल तर तो सत् + मार्ग = सन्मार्ग असतो. (या शब्दातही त् च्या पुढे म आल्यामुळे त् चा न झाला आहे.) मृत्यूनंतर आत्म्यास 'सत् गती' लाभो अशी प्रार्थना केली जाते. त्यामागे लोकांची 'सत् भावना' असते. लिहिताना, बोलताना हे शब्द सद्गती, सद्भावना असे बदलून जातात. (कारण त् पुढे ग, भ ही मृदू व्यंजने आली की त्याचा द् होतो, असा नियम आहे.)
चांगली बुद्धी 'सत् मती' असते. म्हणजेच सन्मती. सत् ने योग्य मार्गावर आणलेले असे अनेक शब्द आपण वापरतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा