78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

52. आजचा शब्द 'सत्' भाग १.

 


सत् हे एक विशेषण आहे. 

त्याचा अर्थ असणारा, खरा, चांगला, साधु, योग्य, ब्रह्म.

व्यक्ती स्वभावाने चांगली असेल तर तिला आपण 'सज्जन' म्हणतो. सत् + जन = सज्जन असा हा शब्द तयार होतो. प्रातःकाल हा चांगला काळ असतो म्हणून त्याला सत् + काल = सत्काल म्हणतात. मराठीत तो 'सकाळ' झाला. 

सत् चा विरुद्ध आहे असत्. सत् आणि असत् या दोन्हीमधील फरक ओळखण्याची बुद्धी म्हणजे विवेक. त्यालाच आपण 'सत् असत् विवेक' म्हणतो. परंतु संधीनियमाने तो शब्द 'सदसद्विवेक' असा लिहिला जातो. सच्चिदानंद या नावातही सत् चित् आनंद असे तीन शब्द आहेत. सत् आणि आनंद मिळून 'सदानंद' होतो. हे खंडोबाचे एक नाव आहे.

मित्र चांगला असेल तर तो सत् मित्र असतो. पण संधीच्या नियमाने 'सन्मित्र' होतो. चांगला गुरू हा सद्गुरू असतो. चांगला गृहस्थ हा सद्गृहस्थ आणि चांगले आचरण सदाचरण असते. या सर्व शब्दांमध्ये त चे रूपांतर द मध्ये होते. (माणसाच्या तोंडावाटे उच्चार होतानाच हा बदल होतो म्हणूनच तसा नियम बनवला आहे.)

चांगला मान द्यायचा असेल तर सत् + मान = सन्मान केला जातो. हिंदीत 'सम्मान' असे लिहितात. कारण त्यात सम् हा उपसर्ग मान सोबत जोडला आहे. त्यामुळे सन्मान व सम्मान हे दोन एकाच अर्थाचे वेगळे शब्द आहेत. सत्कार हाही शब्द त्याच अर्थाने आपण वापरतो. (बंगाली भाषेत सत्कार म्हणजे अंत्यसंस्कार. त्यामुळे तिकडे 'सत्कार' हा शब्द जपून वापरावा.)

सत् या विशेषणासोबत येणारे आणखी काही शब्द पुढील भागात पाहू. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.