51. आजचा धातू 'हृ'. भाग 2.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आधीच्या भागात आपण हृ धातू असलेले आहार, प्रहार, संहार, असे काही शब्द पाहिले. हृ म्हणजे नेणे, घेऊन जाणे. हा धातू आणखी काही उपसर्गांसोबत ज्या शब्दांमध्ये येतो ते आज पाहू. विहार म्हणजे खेळ, क्रीडा, सहल, क्रीडांगण आणि मठ. पक्षी आकाशात विहरत होते, आहारविहार उत्तम असावा किंवा बौद्धविहार, असा अनेक ठिकाणी 'विहार' हा शब्द भेटत राहतो.
अव हा उपसर्ग लागून 'अवहार' झाला की अर्थ बदलतो. अवहार म्हणजे तात्पुरता तह किंवा मागे येणे. याच अवहारला पुन्हा वि उपसर्ग लावला की वि+अवहार = व्यवहार असा शब्द बनतो. व्यवहार म्हणजे आपसातील देवाणघेवाण, व्यापार, लोकरीत. जी गोष्ट व्यवहारात आणणे शक्य नसते ती 'व्यवहार्य' नसते.
परि हा उपसर्ग वापरला की, 'परिहार' होतो. परिहार म्हणजे
दूर करणे. वैद्य रोगाचा परिहार करतो. जी अडचण दूर करता येते ती 'परिहार्य' असते. जी अडचण दूर करता येत नाही ती 'अपरिहार्य' असते.
उद् हा उपसर्ग लागलेला उद् +हार = उद्धार हा अत्यंत ओळखीचा शब्द आहे. वर ओढून काढणे, रक्षण करणे, संकटातून वाचवणे म्हणजे उद्धार करणे. मराठीत या उद्धाराला एक नकारात्मक छटाही आहे. पूर्वजांचा वाईट इतिहास कुणी उकरून वर काढला की 'सात पिढ्यांचा उद्धार' केला असे म्हणतात.
एखादे सुंदर दृश्य आपले मन मोहून टाकते. तेव्हा आपल्या मनाचे 'हरण' झालेले असते. म्हणून ते दृश्य 'मनोहर' आहे असे आपण म्हणतो. मनोहरचे स्त्रीलिंगी रूप मनोहारिणी. शरीरात अधिक वाढलेला वात, पित्त किंवा कफ असेल तर तो कमी करण्यासाठी वातहर, पित्तहर आणि कफहर औषधे आयुर्वेदात दिली जातात. तम म्हणजे अंधार आणि तमोहर म्हणजे अंधार दूर करणारा सूर्य, चंद्र किंवा दिवा वगैरे. वंदे मातरम या गीतामध्ये मातृभूमीचे वर्णन 'दशप्रहरणधारिणी' आणि 'कमलदलविहारिणी' असे केले आहे. दशप्रहरणधारिणी म्हणजे दहा अस्त्रे धारण करणारी दुर्गा आणि कमलदलविहारिणी म्हणजे कमळावर आसीन लक्ष्मी.
हृ या धातूची ही मनोहारी रूपे अनंत आहेत. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा