49. आजचा शब्द 'जन्'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जन् हा जन्मण्याचा धातू आहे. पण यातून जन्मणारे शब्द अतिशय रंजक आहेत. उत्पन्न होणे, उद्भवणे, होणे, घडणे, जन्म देणे, असे या धातूचे अर्थ आहेत.
जन्म देते ती जननी आणि जनक म्हणजे बाप या आपल्या ओळखीच्या शब्दांमागे हाच धातू आहे.
या जन् धातूमधील फक्त 'ज' हे उपपद वापरून अनेक सामासिक शब्द बनतात. जसे पंकज, नीरज, सहज वगैरे. पंक म्हणजे चिखल. चिखलात जन्मणारे कमळ म्हणजे 'पंकज'. नीर म्हणजे पाणी. पाण्यात उगवणारे कमळ म्हणजे 'नीरज'. सोबत उत्पन्न होते ते 'सहज'. केशर काश्मीरमध्ये पिकते म्हणून त्याला 'कश्मीरज' म्हणतात.
अनुज म्हणजे तुमच्या नंतर जन्मलेला लहान भाऊ. अनुजा म्हणजे लहान बहीण. तुमच्या आधी जन्मलेला म्हणजे मोठा भाऊ असेल तर 'अग्रज'. कुसुमचा मोठा भाऊ म्हणजे 'कुसुमाग्रज' आणि गोविंदचा मोठा भाऊ असेल तर 'गोविंदाग्रज'. अग्रजा म्हणजे मोठी बहीण. तुमच्या घराण्यात 'पूर्वी' जन्मलेले सर्व जण तुमचे पूर्वज असतात. तर तुमच्या वंशात नंतर जन्मणारे 'वंशज' असतात.
राज्यात जन्मलेले लोक म्हणजे 'प्रजा' आणि त्यांचा राजा 'जनदेव' असतो. जनता आणि जंतु या नावांमागेही जन् हाच धातू आहे. वीजनिर्मिती करणार्या यंत्राला आपण 'जनित्र' म्हणतो. इंग्रजीत ते 'जनरेटर' असते. या दोन्ही भाषांमधील समानता लक्षात घेण्यासारखी आहे.
सूर्य संपूर्ण विश्वाला दृश्यमान करतो म्हणून त्याला 'जनचक्षु' असेही एक नाव आहे.
राष्ट्र, वंश, समाज या अर्थाने पूर्वी 'जनपद' असा शब्द प्रचलित होता. आजही उत्तर भारतात जिल्ह्यासाठी 'जनपद' असा शब्द कार्यालयीन कामकाजातही वापरतात. जनपद मोठे असेल तर 'महाजनपद' असेही म्हटले जात असे. प्राचीन भारतात अवंती, काशी, कोशल, कुरु, गांधार, मगध इत्यादी १६ महाजनपदे प्रसिद्ध होती.
जन् या धातूने असे असंख्य शब्द प्रसवले आहेत. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
सुंदर लेख
उत्तर द्याहटवाखूप छान, शब्द तर अनेकांना माहिती असतो मात्र त्याचे अर्थ barychda माहिती नसते, आमच्या माहिती त भर पडेल
हटवा