78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

48. आजचा शब्द 'अयन'.

 


अयन म्हणजे जाणे, मार्गक्रमण करणे, रस्ता, अर्धे वर्ष, मोक्ष, प्रवेशमार्ग.

रामायण, दक्षिणायन, उत्तरायण हे शब्द आपल्याला माहीतच आहेत. रामाची उत्तरेकडून लंकेपर्यंत जाण्याची कथा म्हणजे रामायण. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा आस तिरका असल्यामुळे सूर्य आपल्याला कधी दक्षिणेकडे जाताना दिसतो. तर कधी उत्तरेकडे सरकताना दिसतो. यालाच सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणतात. याशिवाय प्रशमायन, पुरुषायण, समुद्रायण, स्वेदायन असे काही अपरिचित शब्दही आहेत.

इंद्रियांचे शमन करणे किंवा त्यांना आवरणे हाच ज्याचा मार्ग आहे त्या मुनीला 'प्रशमायन' असे म्हटले जाते. जिवाचे आत्म्यात एकरूप होऊन जाणे म्हणजे 'पुरुषायण'. शरीरातून घाम बाहेर पडण्याचा मार्ग 'स्वेदायन' आणि नदीचे समुद्राकडे जाणे म्हणजे 'समुद्रायण' आहे. 

आकाशातील नक्षत्रे किंवा राशी आकाशात मोजण्यास सुरुवात कोठून करावयाची यासाठी दोन पद्धती प्रचारात आहेत. निरयन आणि सायन पद्धती, अशी त्यांची नावे आहेत. यातही अयन आहेच.

अयन म्हणजे प्रवेशमार्ग. या अर्थाने हा शब्द गीतेमध्ये आला आहे.

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः। या श्लोकात दुर्योधन म्हणतो की, भीष्माचार्यांच्या रथाभोवती प्रत्येक प्रवेशमार्गावर इतर योद्ध्यांनी उभे राहून त्यांना संरक्षण द्यावे.

या सर्व शब्दांमागे 'अय' धातू आहे. अय् म्हणजे जाणे. या धातूला उद् हा उपसर्ग लागला की 'उदय' होतो. सूर्याचा उदय होतो म्हणजे तो आकाशात वर जातो. एखाद्या संस्थेची भरभराट होते तेव्हा तिचा 'अभ्युदय' होतो आणि कुणी पळून जातो 'पलायन' करतो. अयन हा शब्द असा विविध रूपांमध्ये दिसत राहतो.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.