47. आजचा शब्द 'मान'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मान म्हणजे आदर, गौरव, गर्व, क्रोध, पुरावा, माप, सारखेपणा, विस्तार.
याला विविध उपसर्ग लागून वेगवेगळ्या अर्थाचे शब्द तयार होतात. सन्मान, अपमान, अवमान, मानहानी हे तर खूपच ओळखीचे शब्द आहेत. परंतु परिमाण, प्रमाण, निर्माण या शब्दांतही 'मान' आहेच. एका नियमाने यात शेवटचा न बाणाचा ण झाला आहे. परिमाण म्हणजे वजन, संख्या, आकारमान. प्रमाण म्हणजे खरे तर पुरावा असा अर्थ आहे. हिंदी भाषेत प्रमाण म्हणजे पुरावा याच अर्थाने हा शब्द वापरला जातो. मात्र मराठीत प्रमाण म्हणजे टक्केवारी असा अर्थ झाला आहे.
अनुमान म्हणजे अंदाज आणि अनमान म्हणजे अनादर किंवा संकोच. अभिमान आणि स्वाभिमान असणे योग्य असले तरी त्यात दुष्टता शिरली तर तो दुराभिमान होतो. मान म्हणजे अहंकार आणि अहंकाराने आंधळ्या झालेल्या व्यक्तीर मानांध म्हणतात. अतिमान म्हणजे जास्त अहंकार.
चाणक्यनीतिमध्ये एक श्लोक आहे...
अतिदानात् बलिर्बद्धो अतिमानात् सुयोधनः।
(अतिदानामुळे बळी बांधला गेला, अतिमानामुळे दुर्योधन नष्ट झाला.)
उपमान व उपमेय हे शब्द व्याकरणात नेहमीच सापडतात. ज्या वस्तूची उपमा दिली आहे तिला उपमान म्हणतात आणि ज्या वस्तूला ती उपमा दिली आले तिला उपमेय म्हणतात. चंद्रासारखा चेहरा म्हटले की यात चंद्र हे उपमान आहे आणि चेहरा हे उपमेय आहे.
मानाने दिली तर ती मानद पदवी असते. मानद पदेही असतात. मानाने दिले जाणारे धन म्हणजे मानधन असते. वेळेचे मान मोजणार्या पात्रास मानरंध्रा असे नाव आहे. मानरंध्रा म्हणजे 'घटिकापात्र'. उच्चांक मोजणार्या पट्टीस मानदंड म्हणतात. व्यवहारात, खेळात असे नवनवे 'मानदंड' स्थापित केले जातात. (मान हा एक प्रत्ययसुद्धा आहे. पण त्याविषयी नंतर लिहू.) असे अनेक शब्द आपण मान तुकवून वाचतो, लिहितो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा