78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

46. आजचा शब्द 'गमन'.


 

गमन म्हणजे जाणे, गती, प्रयाण.

आगमन म्हणजे येणे. निर्गमन म्हणजे निघून जाणे. गम् हा धातू या शब्दांमागे आहे. ज्या विषयात बुद्धी सहज प्रवेश करते तो विषय 'सुगम' असतो. जे संगीत सहज कळते ते 'सुगम संगीत'. पर्वतासारखा भाग जाण्यासाठी अवघड असतो म्हणून तो 'दुर्गम' असतो. पर्वतावर मंदिर असलेल्या देवीला त्यामुळेच 'दुर्गा' म्हणतात. 

जी सतत पुढे जात राहते ती 'गंगा' असते. या नावामागेही गम् हाच धातू आहे. नदीचे नाव काहीही असले तरी 'गंगा' हे नदीसाठी वापरले जाणारे सामान्य नाम आहे. जसे गोदावरी नदीला आपण 'दक्षिण गंगा' म्हणतो. 

जेथून नदीचा आरंभ होतो तो 'उगम' असतो आणि अनेक नद्या जेथे एकत्र येतात तेथे 'संगम' होतो. 

आगम आणि निगम या शब्दांचा अर्थ वेद, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र असाही आहे.

संत चोखामेळा एका अभंगात म्हणतात..

"आगमाची आढी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा।।" (आम्हाला काही कळत नाही, असे संत कितीही म्हणत असले तरी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व निर्विवाद आहे.)

गम् धातूचे एक विशेषण 'गामी' असे आहे. 'गामी' म्हणजे जाणारा. पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा, प्रगत विचारांचा. प्रतिगामी म्हणजे मागे जाणारा, जुन्या विचारांचा. अधोगामी म्हणजे खाली जाणारा. उर्ध्वगामी म्हणजे वर जाणारा. गामिनी म्हणजे जाणारी. माधुरी दीक्षित यांच्या एका चित्रपटाचे नाव 'गजगामिनी' असे आहे.

गम् धातूचे भूतकालवाचक विशेषण गत असे आहे. त्यावरून आगत, स्वागत, प्रगत, संगत, विगत असे शब्द बनतात. अतिथी म्हणजे अभ्यागत. अनेक कार्यालयांमध्ये बाहेरून येणार्‍या लोकांना बसण्यासाठी 'अभ्यागत कक्ष' असतो. एखाद्या कलेचा सतत सराव केला तरच ती 'अवगत' होती. चोरांकडून मुद्देमाल 'हस्तगत' केला जातो. गती, प्रगती, अधोगती, दुर्गती, सुसंगती या शब्दांमागेही गम् - गच्छ् हाच धातू आहे.

संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.