45. आजचा शब्द 'जीर्ण'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जीर्ण म्हणजे म्हातारपण, वृक्ष, जुने, पचलेले अन्न.
खाल्लेले अन्न पचले की ते 'जीर्ण' होते. पचले नाही तर 'अजीर्ण' होते. म्हणजेच अपचन होते. पचनशक्तीला आयुर्वेदात जीर्णशक्ती म्हणतात. जुने, पडझड झालेले घर असेल तर त्याला 'जीर्णवाटिका' म्हणतात. जुनी इमारत नवी करायची असेल तर तिचा जीर्णोद्धार करतात. अंगात ताप बरेच दिवस मुरला की त्याला 'जीर्णज्वर' म्हणतात.
"वासांसि जीर्णानि यथा विहाय।
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।।
असा एक श्लोक गीतेमध्ये आहे.
जीर्ण झालेले कपडे टाकून जसे लोक नवे कपडे धारण करतात तसे आत्माही जुने झालेले शरीर सोडून नवे शरीर धारण करतो. असा या श्लोकाचा अर्थ.
जीर्ण हे जॄ धातूचे भूतकालवाचक विशेषण आहे.
जॄ धातूपासून 'जर' असे नाम तयार होते. जर म्हणजे जुने होणे. जी कलाकृती कधीच जुनी वाटत नाही तिला आपण अजर + अमर = अजरामर कलाकृती म्हणतो. जरावस्था म्हणजे म्हातारपण. जरठ म्हणजे वृद्ध पुरुष. जरडी म्हणजे वृद्ध महिला. अवस्था फारच खिळखिळी झाली असेल तर तिला 'जराजर्जर' असा शब्द वापरला जातो.
मराठीत 'जिरणे' 'जिरवणे' अशी क्रियापदे आहेत. जास्त जेवण झाले की अन्न 'जिरवण्यासाठी' लोक फेरफटका मारून येतात. या क्रियापदांमध्येही जॄ हाच धातू आहे.
भारतीय स्वयंपाकघरात 'जिरे' ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मुळात तो 'जीरक' असा शब्द आहे. अन्नाच्या पचनास म्हणजेच जिरण्यास मदत करतात म्हणून त्यांना 'जिरे' म्हणतात.
जीरकाद्यारिष्ट हे औषध पचनशक्ती वाढवण्यासाठी देतात. यातही जिरे हाच मुख्य घटक असतो. कदंब वृक्षाचे एक नाव 'जीर्णपर्ण' असेही आहे.
जीर्ण शब्दाने व्यक्त होणार्या अनेक जुन्या वस्तू आपण रोजच पाहतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा