78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

44. आजचा शब्द 'उदर'.

 


उदर म्हणजे पोट, जठर, आतला भाग.

कृष्णाचे एक नाव दामोदर असे आहे. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. अत्यंत खोडकर असल्यामुळे यशोदेने कृष्णाला दोरीने उखळाला बांधले होते. त्यामुळे ज्याच्या पोटावर दोरीचे वेढे होते त्याला 'दामोदर' असे नाव पडले. एकाच उदरातून जन्म घेणार्‍या भावंडांना 'सहोदर' म्हणतात. (एका संस्कृत हास्योक्तीमध्ये वैद्याला यमराजाचा सहोदर म्हणजे भाऊ असे गमतीने म्हटले आहे.)

पोट फुगण्याच्या विकाराचे आयुर्वेदात अनेक प्रकार सांगितले आहेत. जलोदर, वातोदर, सर्पोदर, मत्स्योदर, प्लीहोदर इत्यादी.

घोड्याला अमृतसहोदर असेही म्हणतात. कारण समुद्रमंथनाच्या आख्यायिकेत अमृतासोबत उच्चैःश्रवा नावाचा घोडाही निघाला होता. खादाड व्यक्तीला उदरपिशाच्च म्हणतात. पोट भरण्याच्या उद्योग हे उदरनिर्वाहाचे साधन असते. पोट हलवून नाचण्याच्या प्रकाराला उदरनृत्य म्हणतात. यात चार प्रकारे पोटाच्या हालचाली होतात. पोटावर चरबी नसलेल्या स्त्रीसाठी 'कृशोदरी' असे संबोधन प्राचीन साहित्यात आढळते. 

पोटावर सरपटणार्‍या गोगलगाय वगैरेंसाठी 'उदरतलपाद' अशी संज्ञा आहे. 

"उदरी शनी येणे' असा एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ खाण्यापिण्याची चंगळ असलेली व्यक्ती. (अशा व्यक्तीच्या कुंडलीत जन्मस्थानी शनी असतो.) उदरशय म्हणजे गर्भ. उदरिणी म्हणजे गर्भवती. उदरिक म्हणजे ढेरी असलेला मनुष्य.

जालना जिल्ह्यातील अंबड या तालुक्याच्या गावी माशाच्या आकाराचा डोंगर आहे. त्यावर ज्या प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे तिचे नाव 'मत्स्योदरी' देवी आहे.

उदर या शब्दाने अशी अनेक नावे आपल्या पोटात सामावून घेतली आहेत. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.

म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

विनोद जैतमहाल

9823028332


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.