42. आजचा शब्द 'ग्रह'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ग्रह म्हणजे धरणे, घेणे, ओढणे, पकड, मिठी, समजूत.
सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने ओढलेले असतात ते आकाशातील ग्रह. ग्रहाच्या जवळ असेल तर उपग्रह. आ उपसर्ग लागला की आग्रह. सत्यासाठी असेल तर सत्याग्रह आणि टोकाचा असेल तर दुराग्रह असतो.
निग्रह म्हणजे आवरणे किंवा शिक्षा करणे. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलिस दलाचे घोषवाक्य आपल्याला निळ्या गाडीवर दिसते. यातील 'खल' म्हणजे दुष्ट आणि निग्रह म्हणजे आवरणे किंवा शिक्षा करणे. योगसाधना करणारे लोक इंद्रियांची भटकंती आवरून धरतात. त्याला इंद्रियनिग्रह म्हणतात.
परिग्रह म्हणजे धारण करणे. संसारी गृहस्थ अनेक वस्तूंचा परिग्रह करतो. मात्र संन्याशाला 'अपरिग्रह' साधावा लागतो. वस्तू नीट जमा करून ठेवल्या की त्याला 'संग्रह' म्हणतात. जेथे अशा वस्तू नीट लावून ठेवतात त्याला 'संग्रहालय' असे नाव आहे. मात्र 'विग्रह' म्हणजे वेगळे करणे किंवा भांडण.
ग्रहण करतो तो ग्राहक. बोलीभाषेत त्याला आपण गिर्हाइक म्हणतो. संग्रह करणारा संग्राहक.
चटकन आग पकडणारा पदार्थ 'ज्वालाग्राही' असतो. गुप्त गोष्ट किंवा तात्पर्य जाणून घेणारा 'मर्मग्राही' असतो. विवाहात वधूचा हात हाती घेण्याचा विधी 'पाणिग्रहण' असतो. अधिकृतपणे खासगी जमिनीवर सरकारी ताबा मिळवण्यासाठी भूमीचे 'अधिग्रहण' केले जाते.
गुरु जेव्हा शिष्याला गुरुमंत्र आणि दीक्षा देतात तेव्हा त्याला 'अनुग्रह' म्हणतात.
नेमि म्हणजे परीघ. पृथ्वी या ग्रहाच्या परीघावर चंद्र फिरतो म्हणून त्याला 'ग्रहनेमि' असे नाव आहे. ग्रहांचा स्वामी म्हणून सूर्याला 'ग्रहपती' म्हणतात. ग्रहांच्या स्थानाचे चिंतन करतो म्हणून ज्योतिषाला ग्रहचिंतक, ग्रहविप्र अशी नावे आहेत.
अभिज्ञानशाकुंतलम् या कालिदासाच्या नाटकात घोड्याच्या लगामासाठी 'प्रग्रह' असा शब्द सापडतो. ओढून धरण्यासाठीच लगामाचा उपयोग होतो म्हणून त्यासाठी 'प्रग्रह' शब्द असावा.
ग्रहाने गृहीत केलेले असे अनेक शब्द आपल्याला सापडतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा