41. आजचा शब्द 'गण'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गण म्हणजे कळप, समूह, जमाव, जात, वर्ग, शंकराचे गण.
गणनायक, गणाध्यक्ष, गणवल्लभ, गणेश ही नावे सेनापतीसाठी किंवा 'गणपती'साठी वापरली जातात. 'अचल' म्हणजे पर्वत हे आपल्याला माहीत आहे. शंकराचे गण जेथे राहतात त्या पर्वताला 'गणाचल' म्हणतात. गणाचल म्हणजे कैलास पर्वत.
निवडणुका लागल्या की गण आणि गटांची चर्चा सुरू होते. पंचायत समिती मतदारसंघाला 'गण' असे नाव दिले आहे. राजा नसलेले आणि लोकांच्या बहुमताने चालवले जाणारे राज्य म्हणजे 'गणराज्य'. भारतात असे गणराज्य सव्वीस जानेवारी १९५० रोजी आरंभ झाले म्हणून या दिवसाला 'गणतंत्र' दिन म्हणतात. इंग्रजीत गणतंत्र म्हणजे रिपब्लिक.
गण म्हणजे लोकांचा समूह. लोकसमूह ज्या स्त्रीशी पती असल्याप्रमाणे वागतो तिला 'गणिका' असे नाव आहे. जेथे समूहाने जेवण केले जाते त्या खानावळीला 'गणभोजनगृह' म्हणता येईल.
गणना करणे म्हणजे मोजणे, विचारात घेणे. जो मनुष्य ग्रहतार्यांची स्थाने मोजून भविष्य सांगू पाहतो त्याला 'गणक' म्हणतात. गणक म्हणजे ज्योतिषी. त्याची पत्नी गणकी. मात्र 'गणकयंत्र' म्हणजे कॅल्क्युलेटर. याला सम् हा उपसर्ग लावून 'संगणक' असा कम्प्युटरसाठी नवा शब्द बनवण्यात आला. देशातील लोकांची संख्या मोजताना जनगणना किंवा शीरगणती केली जाते. जनगणनेचे काम ज्या कर्मचार्यांवर सोपवले जाते ते 'प्रगणक' असतात.
हिंदीत मोजण्याला 'गिनती' म्हणतात. गण् चा भूतकाळ 'गणित'. गणित म्हणजे मोजलेला. अगणित म्हणजे मोजता न येणारा.
ज्या व्यक्तीला आपण महत्त्व देत नाही किंवा विचारात घेत नाही तिला आपण 'गिनत' नाही, असे बोलीभाषेत म्हणतो.
'गण्य' हे गण् धातूपासून बनलेले विशेषण आहे. गण्य म्हणजे मोजता येण्याजोगे. त्याचा विरुद्धार्थी शब्द 'नगण्य'.
गण् धातूने विचारात घेतलेले असे अगणित शब्द आपल्याला रोजच्या वापरात दिसतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा