39. आजचा शब्द 'दीप'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दीप् या धातूचे अर्थ प्रकाशणे, पेटणे, वाढणे, तळपणे असे आहेत.
दीप म्हणजे दिवा. त्याचा उजेड प्रखर असेल तर प्रदीप. सौम्य प्रकाश असेल तर संदीप. देखणा दिवा असेल तर सुदीप. हे सर्व आपल्याला माहीत असलेले शब्द आहेत. आज काही अपरिचित शब्दांची ओळख करून घेऊ.
दीपकूपी म्हणजे दिव्याची वात. काजळ किंवा समईला दीपध्वज म्हणतात. दीपकिट्ट म्हणजे काजळी. दिव्यावर झडप घालणार्या पतंगाला 'दीपशत्रू' असे नाव आहे. दीपक म्हणजे दिवा किंवा केशर आणि दीपिका म्हणजे दिवटी, मशाल किंवा चांदणे.
पचनशक्ती कमी झाली असेल तर जठरातील अग्नी वाढवण्यासाठी दिले जाणारे औषध 'अग्निप्रदीपक' असते.
(काळे मीठ, जीरे, आले, तूप आदींमुळे जठराग्नी प्रदीप्त होतो.)
जे दृश्य पाहून भावना उचंबळून येतात ते दृश्य 'उद्दीपित' करणारे असते. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य 'नेत्रोद्दीपक' असते.
दीप् चा भूतकाळ दीप्त आणि त्याचे स्त्रीलिंगी रूप दीप्ती.
दीप्त म्हणजे पेटलेले, तेजस्वी, शोभा, कांती.
मांजराचे डोळे अंधारात चमकतात म्हणून त्याला 'दीप्तलोचन', 'दीप्ताक्ष' अशी नावे आहेत. तेजस्वी पिंगट रंग असल्यामुळे सिंहाला 'दीप्तपिंगल' म्हणतात. 'दीप्तलोह' म्हणजे पितळ. पेटती किरणे असल्यामुळे सूर्य 'दीप्तांशु' आहे. तेजस्वी अंग असल्याने मोर 'दीप्तांग' आहे.
दिव्याच्या ज्योतीला 'दीपकलिका' म्हणतात. ज्ञानेश्वरीत हा शब्द सापडतो.
जैसी दीपकलिका धाकुटी
परि बहु तेजाते प्रकटी।
तैसी सद्बुद्धी हे थेकुटी
म्हणो नये।।
दिव्याची ज्योत छोटीशी असली तरी तिच्यातून मोठे तेज प्रकट होते. तसे सद्बुद्धी असेल तर ते व्यक्तिमत्त्वही तेजस्वी होते. त्यामुळे सद्बुद्धीला कमी लेखू नये, असे संत ज्ञानेश्वर सांगतात. बाकी दीपाली किंवा दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ, रांग हे तुम्हाला माहीतच आहे.
दीप् या धातूमधील वेलांटी दीर्घ असल्यामुळे त्यापासून बनणार्या सर्व शब्दांमध्ये वेलांटी दीर्घच लिहावी.
दीपने प्रकाशित केलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
खुप सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 🙏
हटवासूंदर.शब्दांचे अर्थ समजल्यावर वेगळाच आनंद अनूभवायला मीळतो.धन्यवाद सर.
उत्तर द्याहटवाहार्दिक आभार.
हटवा