37. आजचा शब्द 'दिक्'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिक् म्हणजे दिशा. किंवा जागेचा असा विस्तार ज्यात वस्तू असतात किंवा घटना घडतात.
दहा दिशांचे तीन आयाम आहेत. आयाम म्हणजे इंग्रजीत डायमेंशन. रुंदी, उंची आणि खोली. सिनेमा पाहताना जर चित्राची फक्त रुंदी आणि उंची दिसत असेल तर तो 'टूडी' सिनेमा असतो. मात्र चित्राची खोलीही दिसत असेल तर हे तिन्ही आयाम दाखवणारा सिनेमा 'थ्रीडी' असतो.
जो माणूस दिशा दाखवतो त्याला दिक् + दर्शक म्हणजेच दिग्दर्शक म्हणतात. (या शब्दात संधीनियमाने क् चे रूपांतर ग् मध्ये होते.)
दाही दिशांची राज्ये ज्याने जिंकून घेतली त्याने 'दिग्विजय' मिळवलेला असतो. अंबर म्हणजे वस्त्र. दिशा हेच ज्याचे वस्त्र असते तो 'दिगंबर' असतो.
दिक्काल म्हणजे अवकाश आणि काळ. रुंदी, उंची, खोली यासोबतच काळ हा चौथा आयामही लक्षात घेतला पाहिजे असे आइनस्टाइनचे म्हणणे होते. या चौथ्या आयामाला दिक्काल म्हणजे 'स्पेसटाइम' असे नाव त्याने दिले.
आठ दिशांच्या आठ रक्षक हत्तींना 'दिग्गज' म्हटलेले आहे. दिगंतर म्हणजे परदेश, अंतरिक्ष.
पक्षी जाय दिगंतरा
बाळकांसि आणी चारा।
संत जनाबाईच्या काव्यात 'दिगंतर' हा शब्द आला आहे. क्षितिजाला दिक्तट किंवा दिग्मंडल म्हणतात. दिक्चक्र म्हणजे विश्व. दिशेच्या रक्षक देवतेला 'दिक्पाल' म्हणतात. जो अस्वस्थ आहे आणि सतत जागा किंवा दिशा बदलतो तो तरुण म्हणजे 'दिक्कर'.
कोणत्या दिशेला जावे हे जेव्हा कळत नाही तेव्हा आपण दिङ्मूढ होतो. (यात संधीनियमाने क् चा ङ् झालेला आहे.)
दिक् नुसार दिशा दाखवणारे असे अनेक शब्द आपल्याला दिसतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा