78. आजचा शब्द 'निवेश'.

इमेज
निवेश म्हणजे गुंतवणूक हा अर्थ सामान्यपणे सर्वांनाच माहीत असेल. पण या शब्दाचे मूळ शोधल्यास प्रवेश, परिवेश, आवेश असे त्याचे अनेक नातलग सापडत जातात. या सर्व शब्दांच्या मागे 'विश्' हा धातू आहे. विश् चा अर्थ शिरणे, प्रवेश करणे, बसणे, स्थिर होणे इत्यादी. या विश् चे भाववाचक नामरूप 'वेश' असे होऊन त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि विविध अर्थ सांगणारे शब्द तयार होतात. नि हा उपसर्ग लावून निवेश असा शब्द बनतो. निवेश म्हणजे बसणे, मन लावणे, लग्न लावणे. परंतु मन लावण्याऐवजी पैसा लावला तरी त्याला निवेश म्हणतात. कारण जेथे पैसा असतो तेथे साधारणपणे माणसाचे मन गुंतलेले असते. त्यामुळे गुंतवणुकीला निवेश म्हणतात. जर गुंतवलेला पैसा आणि मन काढून घेतले तर त्याला 'विनिवेश' म्हणतात. विनिवेश म्हणजे निर्गुंतवणूक. उपनिवेश असाही एक शब्द उप आणि नि हे उपसर्ग लावून तयार होतो. उपनिवेश म्हणजे दुसर्‍या देशातून आलेल्या लोकांची वसाहत. जसे इंग्रज भारतात येऊन राहिले तेव्हा त्यासाठी उपनिवेश असा शब्द वापरण्यात आला आणि त्यांच्या सत्तेला हिंदीत 'औपनिवेशिक सत्ता' असे म्हटले जात असे. (औपनिवेशिक हा शब्...

ज़बाने उर्दूही बोलतो

 


ज़बाने उर्दूही बोलतो कवतुके

शहाजहानच्या दरबारातील चंद्रभान नावाच्या ब्राह्मणाने  उर्दू भाषेतील पहिली गझल लिहिली...

न जाने किस शहर अंदर हमनको लाके डाला है।

न दिलबर है, न साकी है, न शीशा है, न प्याला है।।

अस्सल भारतीय भाषा असलेल्या उर्दू आणि मराठी या दोन्ही भाषा इतक्या एकमेकीत मिसळून गेल्या आहेत की त्यांना वेगळे करणे कुणालाही शक्य नाही.

रस्ता, रक्कम, बक्षिस, मंज़ूर, फायदा, रहदारी, कैफ़ियत, मैफ़ल, ज़र्द, मर्द, खुर्द, बुद्रुक असे हजारो उर्दू, अरबी, फारसी शब्द मराठी माणसाने आत्मसात केले आणि स्वतःची भाषा समृद्ध बनवली.

पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. यातील 'हयात' आणि 'दाखला' हे दोन्ही शब्द अरबी, उर्दूमार्गे मराठीत रुळले आहेत. तहसील, महसूल, तहसीलदार, तपशील हे शब्दही अरबीतून उर्दूने आणि नंतर मराठीने घेतले. 

ज़मीन, ज़मीनदार हे फारसी मातीतले शब्द आहेत. ज़मींदोज़ म्हणजे भुईसपाट. मराठीने हा शब्द बदलून 'जमीनदोस्त' करून टाकला. तफ़सीलचा तपशील झाला. दफ्तर मध्ये 'दप्तर' असा बदल होऊन ते मुलांसोबत शाळेत जाऊ लागले किंवा तलाठ्याचे दप्तर झाले.

पोलिसांना गुप्त माहिती देणारा 'खबरी' हा शब्द अरबी आहे. त्यावरून खबरदार, खबरदारी असे फारसी प्रत्यय लागलेले शब्दही आता मराठीच आहेत.

शेतात दरवर्षी रबी व खरिपाची पिके घेतली जातात. हे रबी व खरीफ़ कुठून आले? पीकपाणी चांगले आले तर 'आबादीआबाद' होते. नाही तर सगळे 'बरबाद' होते. 

बद म्हणजे वाईट. मआश म्हणजे धंदा. ज्याचा धंदा वाईट आहे त्याला आपण 'बदमाश' म्हणतो. शहर, कसबा, क़ायम, कमाल, ज़ामिन, ज़मानत, फिर्याद असे असंख्य उर्दू शब्द वापरण्यात आपण मराठी लोकांनी काहीही 'कसर' बाकी ठेवलेली नाही. 'कसर' हासुद्धा अरबी शब्द आहे.

एखाद्या 'रास्त' मागणीसाठी 'मोर्चा' काढला जातो. यातील रास्त आणि मोर्चा हे दोन्ही शब्द फारसीतून आपण घेतले.

दक्षिणेतला इब्राहीम आदिलशहा याने 'किताबे नवरस' मध्ये दखनी भाषेत काव्य लिहिले. त्यातील एक रचना अशी...

"विद्या पथ सूजत नहीं या कारन सरसुती 

गनपती रवि ससी भये परकास अन्तरा"

ज्ञानाचा मार्ग दिसत नव्हता म्हणून सरस्वती, गणपती हे सूर्य चंद्र होऊन ज्ञानमार्ग उजळत आहेत, असे लिहिणारा हा बादशहा फारसीतही काव्यरचना करीत असे.

मराठी बोलणार्‍यांनी संस्कृत, उर्दू, कानडी, पोर्तुगीज, ग्रीक अशा अनेक भाषांमधून उपयुक्त शब्द बिनधास्त घेतले. त्यांचे मराठीकरण केले. 

आज मात्र उर्दू म्हणजे मुसलमानांची भाषा असे म्हणून तिच्याशी दुश्मनी आणि संस्कृत म्हणजे ब्राह्मणांची भाषा असे म्हणून तिच्याशी शत्रुत्व करणारे लोक मराठीचे हितचिंतक म्हणावेत की गारदी? 

ज्या सहजतेने मराठी रसिक कवीला 'दाद' देतो त्याच जोशात तो उर्दू शायरालाही 'इर्शाद' म्हणतो.

मराठीसह ज़बाने उर्दू बोलणारा हा सामान्य मराठी माणूस अशा वेळी कुणाचाही 'मुलाहिज़ा' बाळगत नाही. 

- विनोद जैतमहाल.

टिप्पण्या

  1. सुरेख ! मराठी भाषा आणि तीचे इतर भाषेशी नाते सांगणारं आपल लेखन . धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

11. आजचा शब्द 'अनल'

महाजनांचा मार्ग

78. आजचा शब्द 'निवेश'.