35. आजचा शब्द 'योग'.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
योग म्हणजे जोडणे, उपचार, उद्योग, श्रम, परिणाम.
दररोजच्या वापरात प्रयोग, उपयोग, संयोग हे सतत भेटणारे शब्द आहेत.
मात्र याला अभि उपसर्ग लावला की 'अभियोग' होतो. अभियोग म्हणजे आरोप, युद्ध, हल्ला. ज्याच्यावर आरोप असतो त्याला हिंदीत 'अभियुक्त' म्हणतात. राष्ट्रपतीसारख्या मोठ्या व्यक्तीवर आरोप असतील तर त्यावर 'महाभियोग' लावला जातो. महाभियोगाचा खटला चालवूनच अशा व्यक्तीला पदावरून काढता येते.
एखाद्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी 'आयोग' नेमला जातो. त्यावरील अधिकारी 'आयुक्त' असतो. नियोग म्हणजे आज्ञा, नेमून दिलेले काम. असे काम नेमून दिले की, त्याला 'नियुक्त' केले असे म्हणतात.
योगचा भूतकाळ युक्त. योग म्हणजे जोडणे. त्यामुळे गरजेनुसार जोडणी करून काम फत्ते करणारी गोष्ट म्हणजे 'युक्ती' असते. वापरण्यास अनुकूल वस्तू 'उपयुक्त' असते.
अध्यात्मात ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि अष्टांगयोग प्रसिद्ध आहे.
युज् हा धातू वरील सर्व शब्दांमध्ये समान आहे. युज् पासूनच योजना, नियोजन, संयोजन, आयोजन, प्रयोजन असे शब्द बनतात. ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष आयुष्यात केला की त्याला 'उपयोजन' म्हणतात. उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन. मर्यादित असेल तर 'योजना' असते आणि धरणासारखी मोठी असेल तर 'परियोजना' असते.
मात्र 'वि' उपसर्ग लागला की 'वियोग' होतो. वियोग म्हणजे वेगळे होणे, विरह, अभाव. जो वेगळा होतो त्याला 'वियुक्त' म्हणतात आणि जो जोडला जातो तो 'संयुक्त' असतो.
आयुर्वेदात योग म्हणजे इलाज या अर्थाने कायाकल्प योग, धौती योग आणि जखम भरून येण्यासाठी मलम असेल तर त्याला 'योगांजन' म्हणतात.
यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार इत्यादी अष्टांग योगाची साधना करणारा 'योगी' असतो. स्त्री असेल तर 'योगिनी' असते. मात्र खेळातला प्रतिस्पर्धी 'प्रतियोगी' असतो. आणि स्पर्धा म्हणजे 'प्रतियोगिता' असते.
योगक्षेम, योगनिद्रा, योगमाया अशा अनेक रूपांमध्ये योगायोगाने हा शब्द वेगवेगळे अर्थ घेऊन पुढे येत राहतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.
विनोद जैतमहाल
9823028332
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
दिवाळी उत्तम योग संस्कृत शिकायला आभार. मराठी संस्कृत सुभाषिते व इतर गिर्वाण भारती समजुन घ्यायला मनापासून आवडेल... शुभेच्छा......
उत्तर द्याहटवासंस्कृत शिकण्यासाठी 9823028332 या व्हाट्सपवर कृपया संपर्क करावा. - विनोद जैतमहाल.
हटवासुंदर लेख.
हटवाधन्यवाद. 🙏
हटवा